काळू धरण क्षेत्रातील पुनवर्सनचे लाभ मिळवण्यासाठी केलेली बेकायदेशीर जमीन खरेदी रद्द करण्याची मागणी

काळू धरण क्षेत्रातील पुनवर्सनचे लाभ मिळवण्यासाठी केलेली बेकायदेशीर जमीन खरेदी रद्द करण्याची मागणी

Published on

भूसंपादनावर बेकायदेशीर व्यवहार
काळू धरण क्षेत्रातील पुनवर्सनाचे लाभ मिळवण्यासाठी केलेली बेकायदेशीर जमीन खरेदी रद्द करण्याची मागणी
मुरबाड, ता. २६ (बातमीदार) ः तालुक्यात काळू नदीवर प्रस्तावित असलेला धरण प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पुनवर्सनाचे लाभ मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जमिनींची खरेदी होत आहे. या जमिनींचे व्यवहार रद्द करण्याची मागणी काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष पोपटवराव देशमुख यांनी केली. याबाबतचे निवेदन मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांना दिले आहे.
काळू धरण प्रकल्पाकरिता आवश्यक जागांच्या भूसंपादनाकामी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कल्याण यांनी लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी नवीन भूसंपादन कायद्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये अधिसूचनेच्या दिनांकापासून गावांची बाधित जमीन किंवा जागेचा भाग विकण्यास निर्बंध घातले आहेत, परंतु उपविभागीय अधिकारी कल्याण यांचा आदेश धाब्यावर बसवून काळू नदी परिसरात तळेगाव, जडई, आंबिवली, चासोळे, खुटल-बारागाव, दिघेफळ, फांगळोशी, खरशेत-उमरोली, न्याहाडी, मोरोशी, फांगुळगव्हाण, उदाळडोह, फांगणे, कुडशेत, झाडघर, भोरांडे आणि दिवाणपाडा या महसुली गावांतील जमिनीची खरेदी-विक्री झाली आहे. या जमिनीची खरेदी-विक्री करताना कोणतीही परवानगी न घेता बेकादेशीररित्या व्यवहार करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करावी आणि नियम धाब्यावर बसवून झालेले खरेदीखत रद्द करावे, अशी मागणी समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.

प्रशासनाची बघ्याची भूमिका
भूसंपादन कायदा २०१३ नुसार आधी धरण मग पुनर्वसन, अशी स्पष्ट तरतूद असताना प्रशासन केवळ धरणग्रस्तांचे शोषण होत असताना बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ राऊत यांनी केला आहे.

रस्त्यावर उतरून संघर्ष करणार
खरेदीदार यांनी केवळ धरणग्रस्तांचे लाभ पदरात पाडण्यासाठी खरेदीचा आटापिटा केला आहे, असे समितीचे उपाध्यक्ष भगवान भला यांनी सांगितले. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आमच्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार शिवराम हिलम यांनी व्यक्त केला. याप्रसंगी समितीचे पंढरीनाथ दळवी, रंगनाथ देशमुख, रामभाऊ देशमुख व लालाजी देशमुख उपस्थित होते.

फोटो ओळी
काळू धरण विरोधी संघर्ष समिती संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष पोपटराव देशमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com