कल्याण-डोंबिवलीत ५२ हजार गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा
कल्याण-डोंबिवलीत ५२ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा
शहरात २९३ सार्वजनिक, तर ५२,१८५ घरगुती गणपती विराजमान होणार
डोंबिवली, ता. २६ : गणेशोत्सव २०२५ मध्ये कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण भागात एकूण ५२,४७८ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये २९३ सार्वजनिक गणपती, ५२,१८५ घरगुती गणपती आणि ६,५०२ गौरी-गणपती समाविष्ट आहेत. शहरातील आठ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही स्थापना होणार असून, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे १२,००० घरगुती गणपतींची स्थापना होणार आहे.
गणेशोत्सव काळात शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाने तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत विशेष बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा आणि विसर्जन मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दंगा नियंत्रण पथक, गस्त आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने विसर्जनासाठी ५२ नैसर्गिक जलस्रोत आणि ५८ ठिकाणी कृत्रिम विसर्जन टॅंक उभारले आहेत. त्याचबरोबर ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत ११ ठिकाणी विसर्जन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. विशेषतः मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये एक आणि कल्याणमध्ये दोन ठिकाणी मोठ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. आणखी काही ठिकाणीदेखील कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत.
पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन
नगरपालिका व पोलिस प्रशासनाने नागरिकांना पर्यावरणपूरक व ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनाची सोय, आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छता यासाठीही नियोजन करण्यात आले आहे.
स्थापना होणारे गौरी गणपती
पोलिस ठाणे सार्वजनिक घरगुती गौरी
महात्मा फुले चौक ४६ २,८०० २९०
बाजारपेठ ७३ २,७०० ३००
कोळसेवाडी ४० ९,५६० ४७०
खडकपाडा २४ ५,४७५ ३६७
डोंबिवली ३२ ९,७६५ ९७५
विष्णूनगर ३३ ७,८३५ २५०
मानपाडा २६ १२,००० ३,६००
टिळकनगर १९ २,०५० २५०