माहेरवाशिणी गौराई मातेची आतुरता
माहेरवाशिणी गौराईची आतुरता
पूजनाच्या साहित्यासह पारंपरिक दागिन्यांची खरेदी
शिवडी, ता. २६ (बातमीदार) ः महाराष्ट्रात ठिकठिकाणी गौरी-गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवात दुर्गाष्टमीदिनी गौरी या माहेरघरी येतात. यंदा रविवारी (ता. ३१) घराघरात मोठ्या उत्साहात गौराईंचे आगमन होणार आहे. गौरीमातेच्या पूजनाच्या साहित्यासह पारंपरिक दागिन्यांची खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.
दादर, लालबाग-परळ परिसरात गौरीचे मुखवटे, स्टँड, सुंदर भरजरी आकर्षक साड्या आणि ओवसा भरण्यासाठी सुवासिनींना लागणारी सूप खरेदी करण्यासाठी महिलांची एकच गर्दी झाली आहे. गौरीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यासह दागिने, ओटीचे सामान बाजारात उपलब्ध आहे.
गौरीचे आकर्षक, देखणे मुखवटे मुंबईतील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये चेहऱ्यापासून ते कमरेपर्यंतचे मुखवटे आहेत. त्याचबरोबर मुखवट्यांसह लाकडी व लोखंडी स्टँडच्या विविध डिझाइन्स, उभ्या व बैठ्या सुंदर गौरीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गौरीसाठी विविध प्रकारचे दागिनेदेखील मिळत आहेत. ठिकठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर दागिन्यांचे स्टॉल मांडले आहेत. मोत्यांचे शुभ्र दागिने, कोल्हापुरी साज, ठुशी, नथ अशा पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारात गर्दी केली आहे. यंदा मोत्यांचे व चांदीच्या रंगाच्या दागिन्यांची चलती आहे. पूजा साहित्यासह गौराईच्या साडी खरेदीला वाढती मागणी आहे. सर्वात महत्त्वाचा मान म्हणून गौरी पूजेसाठी सुपामध्ये ओवसा भरण्याची पद्धत आहे. यासाठी सूप खरेदी करण्यात येत असून, १२० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत सुपांच्या आकार व दर्जा यानुसार किमती वाढीव आहेत. विड्याची पाने, सुपारी, फुले, ओवशासाठी लागणारे बदाम, खारीक, खोबरे यांचीही बाजारपेठ बहरली आहे. फळे व फुलांचा बाजारदेखील तेजीत आहे.
गौरीचे दागिने
सजावट केलेल्या गौराईंच्या मूर्तीवर हिरे, कुंदनाच्या दागिन्यांचा साज आहे. त्यामुळे या मूर्ती खूपच देखण्या दिसत आहेत. पुन्हा त्यांचा साज, श्रृंगार करण्याची गरज नाही. मात्र अनेक जण घरीच गौराईंना सजवून श्रृंगार करतात. गौरीसाठी माळ, कानातले, मोत्यांचे, फुलांचे हार आणि या हारांना मध्यभागी मोठे पदक, हिरव्या पानांचे हार आणि पदकाच्या जागी आंबा, सफरचंद, संत्री या फळांचे पदक असे हार बाजारात आले आहेत. याशिवाय महालक्ष्मीच्या साड्या, कपडे यांचे असंख्य प्रकार बाजारात पाहायला मिळतात.
मुखवट्यांची खरेदी
‘लेक लाडकी या घरीची’ अशी आपली गौराई गणेशोत्सवात गौरीच्या रूपाने सासुरवाशिणी लेकी माहेरी येतात, अशी धारणा आहे. काहींकडे खापराचे-पितळेचे मुखवटे तर काहींकडे धातूंचे तसेच मातीच्या उभ्या अथवा पाटावर मांडलेल्या गौरी असतात. गौराईची तीन दिवस पूजा करून पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर सजावटीसाठी लागणारे दागिने, साडी-चोळी, साजश्रृंगाराचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. कुठे गौरीच्या नव्या मुखवट्याची खरेदी, तर कुठे जुन्याच मुखवट्यांना नवी झळाळी देण्याचे काम लगबगीने करण्यात येत आहे. गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले असून, त्यांच्या किमती ५०० रुपयांपासून ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत आहेत. मुखवटे खरेदीसोबतच मंगळसूत्र, चपलाहार, मोत्याच्या माळा, जोडवी, बांगड्या, नथ अशा पारंपरिक दागिन्यांसह विविध साड्याही खरेदी केल्या जात आहेत. किमतीतही फारसा फरक पडला नसल्याने वस्तू खरेदी करण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.