पावसामुळे फुलांचे भाव दुप्पटीने वाढले

पावसामुळे फुलांचे भाव दुप्पटीने वाढले

Published on

पावसामुळे फुलांचे भाव दुपटीने वाढले
गायत्री ठाकूर : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसाचा फटका शेतीसोबतच फुलशेतीलाही बसला आहे. विशेषतः नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, जुन्नर या जिल्ह्यांमधून येणाऱ्या फुलांचे उत्पादन कमी झाल्याने, त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतींवर झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात सजावट व पूजेसाठी फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, मात्र यंदा पावसामुळे फुलांचे उत्पादन घटले असल्याने बाजारात फुलांची कमतरता जाणवू लागली आहे.

अनेक ठिकाणी फुलांचे उत्पादन घटल्याने बाजारपेठेत फुलांची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी गुलाब, झेंडू, मोगरा, जाई, तुळस यांसारख्या फुलांचे भाव गेल्या आठवड्यापेक्षा तब्बल दुपटीने वाढले आहेत. नागरी भागातील बाजारपेठेत विशेषतः सण-समारंभात फुलांची मागणी वाढत आहे; मात्र पुरेशा प्रमाणात फुले उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी भाव वाढवले आहेत. झेंडूचा जुडगा जो मागील आठवड्यात २० ते २५ रुपयांना मिळत होता, तो आता ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुलाबाच्या पाकळ्यांची किंमतही तब्बल २०० रुपयांवर गेली आहे. शेवंतीचे भाव ४०० रुपये किलो तर, गुलाब ६०० रुपये किलोने विकला जात आहे. इतर फुलांचे भावही दुपटीने वाढले आहेत. पावसामुळे फुलांची झाडे कुजणे, कळ्या गळून जाणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होणे यामुळे बाजारात मालाचा पुरवठा कमी झाला आहे. याउलट मागणी मात्र प्रचंड असल्याने भावात वाढ अपरिहार्य ठरली आहे. गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फुलांची आवक घटली, मागणी वाढली
शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने फुलझाडे कुजणे, फुले भिजून नष्ट होणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणे या समस्यांमुळे फुले बाजारात पोहोचण्याआधीच खराब होत आहेत. त्यामुळे नियमित होणारी फुलांची आवक लक्षणीयरित्या कमी झाली आहे. याउलट गणेशोत्सवामुळे ग्राहकांची मागणी मात्र वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत.

पावसामुळे नासधूस
कल्याण आणि डोंबिवलीतील अनेक फुलविक्रेते सध्या फुलांच्या पुरवठ्याअभावी त्रस्त आहेत. विक्रेते अरुण सिंग म्हणाले की, “पावसामुळे फुलांची बरीच नासधूस झाली आहे. यामुळे माल मिळवणं कठीण झालंय. तरीही सध्याचे भाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसे जास्त नाहीत. त्या तुलनेत यंदा ग्राहकांना थोडी सवलतच आहे.”

गणेशोत्सवात अजून दरवाढीची शक्यता
आगामी काही दिवसांत गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला पोहोचणार आहे. पाच, सात आणि १० दिवसांच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असल्याने पूजेसाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. जर हवामानाची हीच स्थिती राहिली, तर फुलांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

बाजारातील किमती
गोंडा २०० रुपये किलो
शेवंती ४०० रुपये किलो
गुलाब ६०० रुपये किलो
मोगरा १२०० रुपये किलो
चाफा १००० रुपये किलो
कमळ ६०० रुपये डझन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com