महापालिका मुख्यालयावर महायुतीची छाप
महापालिका मुख्यालयावर महायुतीची छाप
गणेशोत्सवात झळकले पंतप्रधानांसह बॅनर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण शहराला राजकीय बॅनरबाजीचा विळखा बसला आहे. यातून ठाणे महापालिका मुख्यालयही अपवाद राहिलेले नाही. गेल्या ४३ वर्षांपासून पालिका कर्मचाऱ्यांमार्फत मुख्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे; मात्र यावर्षी पहिल्यांदाच मुख्यालयाच्या दर्शनी भागात लावलेल्या बॅनरने पालिकेच्या गणेशोत्सवावर महायुतीची छाप पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मंगलमूर्ती गणेशाच्या उत्सवाने संपूर्ण ठाणे नगरी भक्तीच्या सागरात न्हावून निघत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हा उत्सव आणि उत्साह ‘मतांच्या’ रुपाने ‘कॅश’ करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची आणि इच्छूकांची चढाओढ लागली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य चौकांपासून ते गल्लीबोळ्यापर्यंत कमानीपासून ते विसर्जन घाटापर्यंत राजकीय बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामध्ये महायुतीने आघाडी घेत थेट पालिका मुख्यालय गाठल्याचे दिसत आहे. वास्तविक कोणत्याही शासकीय कार्यालयात सण- उत्सव साजरे करू नयेत, असे संकेत आहेत. पण ठाणे महापालिका मुख्यालयात गेल्या ४२ वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांमार्फत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाचे हे ४३ वे वर्ष असून २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीला पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी प्रियांका राव, मुलगा आंजनेयही उपस्थित होते.
पालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत होवो, अशी प्रार्थना यावेळी आयुक्तांनी केली. दहा दिवस मुक्कामी असलेल्या मंगलमूर्तीचे यावेळी मनोभावे आदारतिथ्य केले जाणार असल्याने दर्शनासाठी मुख्यालय भाविकांसाठी खुले राहणार आहे. पण यासर्व धामधुमीमध्ये यावेळी पालिका मुख्यालयाबाहेर लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. दीड महिन्यांपूर्वी ठाण्यात उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले होते. या योजनेची उद्दिष्ट्ये आणि इतर माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी पालिका मुख्यालयाच्या गणेश मंडपाचा आधार घेतला आहे. मुख्यालयाच्या दर्शनी भागवरील बॅनरवर एका बाजूला संदेश आणि दुसऱ्या बाजूला दर्शनी भागावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या खालोखाल मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याचे फोटो आहेत. पण या बॅनरवर कुठे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वा धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला स्थान देण्यात आलेले नाही.
कर्मचाऱ्यांनी झळकवले बॅनर
ही सरकारी जाहिरात असल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आला. याविषयी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही जाहिरात सरकारी नसून कर्मचाऱ्यांनी हा बॅनर लावल्याची माहिती देण्यात आली.
महिला केंद्रित योजनांचा आधार
लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही योजना भावनिक नाते जोडणारी ठरली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेनेने ''लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन'' व ''उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान'' हाती घेतले आहे. याची माहिती देणारे हे बॅनर झळकवून पुन्हा एकदा महिला मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.