सुपारीवर साकारले अष्टविनायक
सुपारीवर साकारले अष्टविनायक
अक्षता पाटील यांची आगळीवेगळी कलाकृती
विरार, ता. २८ (बातमीदार) गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना वसई तालुक्यातील टिवरी गावाच्या रहिवासी आणि कलाकार अक्षता विजय पाटील हिने एक विलक्षण व आगळीवेगळी कला सादर केली आहे. अक्षताने सुपारीवर अष्टविनायक गणपती साकारले असून, ही कलाकृती सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ प्रसिद्ध गणपती मंदिरे आहेत. मोरगाव, सिद्धटेक, पाळी, महड, थेऊर, लेंडगाव, ओझर आणि रांजणगाव यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मूर्ती अक्षताने अतिशय बारकाईने आणि कौशल्याने छोट्याशा सुपारीवर साकारल्या आहेत.
अक्षता ही कल्पक आणि नवनवीन माध्यमांवर कलाकृती साकारण्यात विशेष प्रावीण्य मिळवलेली कलाकार आहे. यापूर्वी तिने लसणावर अष्टविनायक गणपती, शिक्षकदिनानिमित्त दोन इंचाच्या दगडावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा, फास्टट्रॅक घड्याळावर सर रतन टाटा यांचे चित्र, एकादशीनिमित्त फुलांच्या पाकळ्यांवर विठ्ठलाचे रूप, ब्रेडच्या स्लाइसवर छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेत. अक्षताच्या कलाकृती हे केवळ कौशल्याचेच नव्हे, तर श्रद्धेचे आणि कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहेत. सुपारीसारख्या लहान व नाजूक वस्तूवर अष्टविनायक साकारताना तिने दाखवलेली बारकाई, कलात्मक दृष्टिकोन आणि मनोभाव लक्षवेधी ठरतो. तिच्या या कामाची परिसरात आणि समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत आहे.