एका क्लिकवर विसर्जन स्थळांची माहिती

एका क्लिकवर विसर्जन स्थळांची माहिती

Published on

एका क्लिकवर विसर्जन स्थळांची माहिती
महापालिकेची गणेशभक्तांसाठी सुविधा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गणपती विसर्जनासाठी कोणतीही अडचण होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये आणि पावसामुळे होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी कल्याण- डोंबिवली महापालिकेने एक उपयुक्त सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यंदा पहिल्यांदाच महापालिकेने आपल्या अधिकृत वेबसाईट आणि समाजमाध्यमांवर एक विशेष लिंक शेअर केली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर नागरिकांना आपल्या घराजवळील विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती मिळू शकते. ही माहिती प्रभागनिहाय दिली असून, त्यामध्ये प्रत्येक विसर्जन स्थळाचा पत्ता, त्याचे नाव, तसेच गुगल मॅपची लिंकही दिलेली आहे. यामुळे कोणते विसर्जन स्थळ आपल्यासाठी सोयीचे आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग निवडावा, आजूबाजूला वाहतूक कशी आहे, हे सर्व काही एका क्लिकमध्ये समजते.

यंदा महापालिका क्षेत्रात जवळपास ५२ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त २९३ मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे बसवण्यात आल्या असून, उर्वरित सर्व घरगुती गणपती आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विसर्जनाचे नियोजन आवश्यक आहे. महापालिकेने यासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. ‘विसर्जन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत ही सोय करण्यात आली आहे. जेणेकरून भाविकांना लांब जावे लागणार नाही आणि विसर्जनही सुरक्षित व सोयीचे होईल.

दरवर्षी विसर्जनाच्या वेळी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यामध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी साचणे, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी होणे आणि विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतुकीवर ताण येणे अशा अनेक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागतो. यंदा हे टाळण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने आधीच नियोजन केले आहे. गुरुवारी दीड दिवसांचे गणपती विसर्जित होतील, तर रविवारी पाच दिवसांचे गणपती विसर्जन होणार आहे. शनिवार-रविवार असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतात. विसर्जन सोहळा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यामुळे या दिवशी वाहतूक अधिक अडथळ्याची शक्यता आहे.

वेळ अन् त्रास वाचणार
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन लिंकचा उपयोग करून आपल्या जवळच्या विसर्जन स्थळाचे स्थान, वेळ आणि वाहतुकीबाबतची माहिती मिळवावी. यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचतील, तसेच प्रशासनालाही वाहतूक नियोजन सुलभ होईल. हा उपक्रम गणेशभक्तांसाठी एक सकारात्मक पाऊल असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com