फॅन्सी मोदकांची मागणी वाढली

फॅन्सी मोदकांची मागणी वाढली

Published on

फॅन्सी मोदकांची मागणी वाढली
पारंपरिक चवीला आधुनिक स्पर्श
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदकांचे आकर्षण आणि मागणीत वाढ होताना दिसून येत आहे. पारंपरिक उकडीचे मोदकांबरोबरच बाजारात विविध फॅन्सी आणि नवनवीन डिझाइनचे मोदक उपलब्ध झाले आहेत. यामध्ये रसमलाई मोदक, चॉकलेट मोदक, रंगीबेरंगी ट्रे मोदक तसेच विविध आकार व डिझाइन असलेले मोदकांचा समावेश आहे. नवी मुंबईतील मिठाईच्या दुकाने, हॉटेल्स तसेच स्‍विगी आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सवर हे मोदक खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
फॅन्सी मोदक फक्त चवीसाठीच नव्हे तर दिसण्यातही आकर्षक असल्यामुळे भेटवस्तू म्हणूनही लोक त्यांचा वापर करतात. काही दुकानदार मोदक आकर्षक पॅकेजिंगमध्ये देतात, ज्यामुळे ते घरपोच देण्यास योग्य ठरतात. घरगुती रेडिमेड उकडीचे मोदकदेखील लोकप्रिय झाले आहेत, ज्यांची किंमत सुमारे ४२० ते ५५० रुपयांमध्ये २१ मोदकांसाठी ठेवण्यात आलेली आहे.
सेंद्रिय मोदकांचा ट्रेंडसुद्धा वाढत आहे. या मोदकांमध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. सेंद्रिय मोदकांमध्ये हापूस आंब्याचा रस वापरून बनवलेले मोदकदेखील खूप पसंत केले जात आहेत. सोशल मीडियावर जाहिरातीमुळे सेंद्रिय मोदकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सवाच्या संपूर्ण १० दिवसांच्या पूजेसाठी मोदकांना मोठा मान असतो. खवा, पेढा, आमरस, मलई, खोबरे यासारख्या पदार्थांपासून बनविलेल्या मोदकांना मोठी मागणी असल्यामुळे कुशल कारागिरांना रोजगाराची संधी मिळते. महिला गृहोद्योग आणि बचत गटांसाठी मोदक व्यवसाय हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
...........
विविध प्रकार व किमती
ऑरेंज चॉकलेट मोदक – ८०० ते ११०० रु/किलो

खोबरे मोदक – ८०० ते १००० रु/किलो

मलई मोदक – ६०० ते ८०० रु/किलो

चॉकलेट मोदक – ८०० ते १००० रु/किलो

आंबा फ्लेवर मोदक – ८०० ते १००० रु/किलो

खवा मोदक – ८०० ते १००० रु/किलो

पेढा मोदक – ५०० ते ७०० रु/किलो

क्लासिक मावा मोदक – ९०० ते १२०० रु/किलो

रसमलाई मोदक – ८०० ते १२०० रु/किलो

शुगर फ्री मोदक – ९०० ते १२०० रु/किलो

केक मोदक – ३०० ते १५०० रु/किलो
................
यंदा उकडीचे मोदक ४० रुपयांना
वाशी (बातमीदार) ः यंदा उकडीच्या मोदकांना सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे, मात्र यंदा मोदकाचे भाव चांगलेच कडाडल्याने भाविकांनी हात आखडता घेतला आहे. नवी मुंबईत काही ठिकाणी मोदक ३५ रुपये, तर काही ठिकाणी ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तरीही मोदकांची आगाऊ मागणी नोंदवली जात आहे. गणेशाच्या प्रसादाचे ताट मोदकांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे गणेशोत्सवात फुले, आरास, बेल पत्री इतकेच महत्त्वाचे स्थान मोदकाचे असते. पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या पिठात ओला नारळ आणि गुळ आदींचे सारण भरून त्याला वळणदार ११ कळ्या पाडून, वरून केशराचा हलकासा रंग देऊन उकडण्यात येतो, मात्र यंदा नारळाबरोबरच तांदळाच्या आणि गुळाच्या वाढलेल्या किमती, तर दुसरीकडे वाढलेल्या मजुरीमुळे पाच वर्षांपूर्वी २१ रुपयांना मिळणारा मोदक आता ३५ ते ४० रुपयांवर पोहोचला आहे. या मोदकात सुक्या मेव्याची मुक्त हस्ते पेरणी करण्याचा प्रयत्नही काही जणांकडून केला जातो. नोकरी-व्‍यवसायानिमित्त कामावर जाणाऱ्या महिलांना मोदक बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रसादासाठी पाच किंवा ११ मोदक खरेदी करण्यावर अधिक भर दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com