उत्सवाला महागाईची झळ

उत्सवाला महागाईची झळ

Published on

उत्सवाला महागाईची झळ
कंठी, हाराला ५० ते ५०० रुपयांचा दर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांचा भाव वधारला आहे. त्यातच हार आणि कंठ्यांचा भावही चढाच आहे. मंगलमूर्ती गणेशाला घालण्यात येणारी फुलांची कंठी ५० ते ५०० रुपयांपर्यंत मिळत असून, शेवंतीची वेणीही ३० रुपयांच्या घरात गेली आहे. हाराच्या किमतीही आकारानुसार वाढल्या आहेत. विशेष म्हणजे जास्त काळ टिकून राहणाऱ्या ऑर्किडच्या फुलांचा हार आणि कंठीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.

गणेशाच्या आगमनाआधी ठाण्याच्या फुल बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाली होती. सलग पडणाऱ्या पावसामुळे यंदा फुलांचे नुकसान झाल्याने गेल्या वेळच्या तुलनेत फुलांचे भाव ५० ते १५० प्रति किलोने वाढले आहेत. हा भाव बुधवारी किंचित कमी झाल्याचे दिसून आले. पण कंठी आणि हाराचे भाव तसेच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. जास्वंदी १,००० ते १,२०० रुपये शेकडा असल्याने दुर्वा-जास्वंदीची कंठी २०० ते ४०० रुपये दराची आहे. दुर्वाची एक जुडी ५० रुपये आहे. गुलछडी ६०० रुपये तर लीली १,००० रुपये किलोने विकली जात असल्यामुळे हारामध्ये त्याचा वापर टाळण्यात येत आहे किंवा कमी वापर होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

बाजारात छोटी साधी कंठी ५० रुपये, दीड फुटापर्यंत १५० रुपये तर मोठी कंठी ५०० ते १,०००च्या पुढे दराने विकली जात आहे. यंदा झेंडू, शेवंतीच्या हारांसोबतच ऑर्किडच्या हारांनाही पसंती मिळत आहे. ऑर्किड ८०० रुपये दराने मिळत असल्याने कंठीची किंमत किमान ४०० रुपये असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कंठ्यांना फुलांसोबतच मणी, झालरने सजवले जात असल्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसत आहेत. तर शेवंती ४०० रुपये किलो असल्याने यंदा वेणीचे भाव वाढल्याचे सांगण्यात आले. सध्या बाजारात २० रुपयांना मिळणारी शेवंतीची वेणी ३० रुपयांपेक्षा अधिक किमतीत मिळत आहे.

आवक घटली
नाशिक, पुणे, कोल्हापूर, चाकण, तळेगाव, आळंदी या ठिकाणांहून फुलांची आवक होत असते. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मालाची आवक घटली आहे, मात्र मागणी कायम असल्याने फुलांना भाव मिळत आहे. अनंत चर्तुदशीपर्यंत फुलांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळेल. पितृपक्ष पंधरावडा सुरू झाला की फुलांचा भाव उतरण्यास सुरुवात होईल, असे फुलविक्रेते हरिश्चंद्र गवस यांनी सांगितले.

कंठीचे भाव
ऑर्किड कंठी : ४०० रुपये
गुलाब कंठी : ३०० रुपये
चाफा कंठी : ५०० रुपये
वेणी : ३० रुपयांपासून पुढे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com