ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन
मुंबई, ता. २८ : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे गुरुवारी (ता. २८) निधन झाले आहे. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळच्या सुमारास १०.१५ वाजता विलेपार्ले येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी स्वाती कर्वे आहे.
‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ या लोकप्रिय मालिकेतून बाळ कर्वे घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘गुंड्याभाऊ’ ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांची आणि दिलीप प्रभावळकर यांची जुळलेली जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. १९३० साली जन्मलेल्या बाळ कर्वेंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नोकरीसोबतच त्यांनी रंगभूमीवरही आपला ठसा उमटवला. १९७०च्या दशकात आलेल्या ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ मालिकेनं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी ‘कुसुम मनोहर लेले’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘रथचक्र’, तांदूळ निवडता निवडता’, ‘मनोमनी’ अशा अनेक नाटकांत भूमिका साकारल्या. चित्रपटसृष्टीतही बाळ कर्वेंनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. ‘जैत रे जैत’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘सुंदरा सातारकर’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘चटक चांदणी’, ‘बन्याबापू’ अशा अनेक मराठी सिनेमांतून अभिनय साकारला. बाळ कर्वेंच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि पडद्यावरील एक महत्त्वाचा कलाकार हरपला आहे. त्यांच्या जाण्याने सिने-नाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून, समाजमाध्यमांवर अनेक सहकलाकार व चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.