किल्ले माहुलीचे ऐतिहासिक वलय लाभलेला गणपती
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. २८ : तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गणपती मंदिर हे येथील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. या परिसरातील निसर्गरम्य सौंदर्य आणि शिवकालीन किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्वामुळे हे मंदिर एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. हे मंदिर भाविकांसह ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहे.
शहापूर तालुक्यातील भाविक सातत्याने या मंदिराला मोठ्या आस्थेने भेट देतात. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवकाळात या मंदिराचे महत्त्व अधिक असून, परिसरातील भाविकांसह दूरवरूनही भक्त येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.
माहुली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन मानला जातो. त्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व लाभले आहे. तानसा अभयारण्याचा भाग असल्याने परिसरात विविध वृक्षराजी, फुलझाडे आणि पक्ष्यांचा वावर दिसतो. त्यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी आलेल्या पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे. त्यामुळे ट्रेकर्सची येथे नेहमीच गर्दी असते.
गणपती मूर्तीची स्थापना नेमकी केव्हा झाली याचे ठोस संदर्भ उपलब्ध नसले तरी हे मंदिर अतिशय जुने असल्याचे स्थानिक सांगतात. काही वर्षांपूर्वी किल्ल्याखालील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला असून, रोजची पूजा-अर्चा गावकऱ्यांच्या वतीनेच केली जाते. नुकत्याच सरलेल्या श्रावण महिन्यात हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. सध्या गणेशोत्सव काळात मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे.
ऐतिहासिक नोंदी
माहुली किल्ला निजामशाही, मुघल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होता. या काळात किल्ल्याची सत्ता आणि संघर्ष महत्त्वपूर्ण होता. किल्ला १४८५ मध्ये निजामशाहीच्या ताब्यात आला होता. १६३५ ते ३६ दरम्यानच्या काळात शहाजीराजेंनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांसोबत कठीण परिस्थितीत येथे आश्रय घेतला होता. १६५८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. अशा ऐतिहासिक नोंदी आढळतात. हा किल्ला संरक्षित स्मारक म्हणून सरकारने १९ मार्च २०१० मध्ये घोषित केला असून येथे असलेल्या मंदिरांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यापैकीच येथील गणपती मंदिर भाविकांच्या आस्थेचे आकर्षण बनले आहे.
कसे जायचे?
गणपती मंदिराला भेट देण्यासाठी जायचे झाल्यास मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकात उतरून रिक्षाने जाता येते. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरून आसनगाव येथून खासगी वाहनानेही जाता येते. आसनगाव येथून माहुली किल्ल्याचे अंतर ५ किमी इतके आहे. शहापूर शहरातील राज्य परिवहनच्या आगारातून एसटी बसनेही जाता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.