आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला

आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला

Published on

आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला
जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उद्या (ता. २९) आझाद मैदानात धडकणार आहेत. जरांगे यांचा मोर्चा मजल दरमजल करीत मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहे. मराठा समाज या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने गणेशोत्सव काळात मुंबईत येणाऱ्या या मोर्चाने मुंबईतील व्यवस्था विस्कळित होण्याची शक्यता आहे. आझाद मैदानासह आजूबाजूचा परिसर आजच गजबजला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २७ ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे पदयात्रा सुरू केली आहे. रात्री २ वाजता पारनेरमध्ये  त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बुधवारी रात्री शिवनेरीवर दाखल होऊन तेथे त्यांनी मुक्काम केला.  शिवनेरीवर शिवरायांचे दर्शन घेऊन सकाळी त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे. उद्या ते आझाद मैदानात पोहोचून दुपारी २ वाजेपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत. जरांगे यांचा भव्य मोर्चा आझाद मैदानात पोहोचण्यापूर्वीच आज त्यांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात जमले होते. कार्यकर्ते गटागटाने घोषणाबाजी करीत आझाद मैदानात दाखल होत होते. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दुमदूमत होता. काही कार्यकर्ते संपूर्ण फोर्ट विभागात फिरताना दिसत होते.
मैदानात ५० बाय ५० फुटांचा मंच बांधण्याचे काम सुरू होते. अल्युमिनियमचे खांब जोडण्याचे काम सुरू होते. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांची चिंता वाढत चालल्याचे दिसते आहे. आझाद मैदानाच्या परिसरात बॅरिगेट्स वाढविण्यात आले आहेत. आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक वीरेंद्र पवार हे स्वत: मैदानात हजर आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश आणि जल्लोष आहे.
...
रेल्वे स्थानकात घोषणाबाजी
‘एक मराठा लाख मराठा,’ ‘जरांगे पाटील आगे पढो,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर धडकणारे कार्यकर्त्यांचे गट देत होते. मुंबईतील तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज स्थानक गजबजले होते. काही कार्यकर्ते स्थानकात बसले होते, तर काही कार्यकर्त्यांचे गट स्थानकातून बाहेर जात होते.
....
पोलिसांनी पाच हजार लोकांना आझाद मैदानात परवानगी दिली आहे; पण त्यापेक्षा जास्त लोक मोर्चात सहभागी झाले आहेत. त्याबाबत  आमची नियोजन समिती नियोजन करणार  आहे. मोर्चासोबत वाहनेही मोठ्या प्रमाणात आहेत. ती आम्ही शक्यतो रेल्वे स्टेशन परिसरात उभी करण्यास सांगितले आहे.
- वीरेंद्र पवार, समन्वयक, महाराष्ट्र राज्य
...
आमच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे. ते मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी आताच मंजूर करून घेतली नाही, तर पुढच्या काळात येणाऱ्या तरुण पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आम्ही सगळे या मोर्चात सहभागी झालो आहोत.
- भास्कर लाटे, पैठण
...
ही ‘आर या पार’ची लढाई आहे. आरक्षण मिळणारच, असा आम्हाला विश्वास आहे. सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. आरक्षण आमच्या हक्काचे आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला मदत होईल.
- हृषिकेश थोरात, जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com