या पुढे वसई विरारमध्ये एक ही अनधिकृत बांधकाम होणार नाही

या पुढे वसई विरारमध्ये एक ही अनधिकृत बांधकाम होणार नाही

Published on

अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा
गणेश नाईक : जखमींच्या प्रकृतीची केली विचारपूस
बोळिंज, ता. २९ (बातमीदार) : विरार पूर्वेकडील विजयनगर परिसरात नुकत्याच घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. २९) दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.
या वेळी एका आढावा बैठकीत बोलताना नाईक यांनी स्पष्ट केले, की जुन्या काळात झालेल्या चुकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. ते म्हणाले, की मृत्यू झालेल्या १७ लोकांच्या आत्म्यांना शांती मिळो. जखमी लवकर बरे होतील. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पाच लाखांच्या मदतीबद्दल त्यांनी माहिती दिली.
नाईक यांनी धोकादायक इमारतींचा मुद्दाही उचलून धरला. शहरात सध्या १४० इमारती धोकादायक असून, त्यात हजारो कुटुंबे राहत आहेत. विरारमध्ये म्हाडाचे हजारो फ्लॅट रिकामे आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना या रिकाम्या फ्लॅटमध्ये हलवण्याबाबत आयुक्तांकडून माहिती घेऊन मंगळवारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मी एक माणूस आहे आणि उपकार करायला आलो नाही तर माझी ही भावना आहे,’ असे म्हणत गणेश नाईक यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे ठोस आश्वासन दिले. गणेशोत्सव संपल्यानंतर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेचे कठोर वारे सुटतील आणि ते थांबा थांबणार नाहीत, असे ते म्हणाले.

कायद्याने धडा शिकवू
गणेशोत्सवानंतर वसई-विरारमध्ये एकही अनधिकृत बांधकाम सुरू राहणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. शॉर्टकटने पैसे कमावण्यासाठी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना यापुढे कायद्याचा धडा शिकवला जाईल आणि धोकादायक इमारतींमधील लोकांना स्थलांतरित करून त्यांना विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

बचाव पथकांचे आभार

या संपूर्ण प्रकरणातील कारवाईसाठी आयुक्त, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि प्रसारमाध्यमांचे त्यांनी आभार मानले. ज्या विकसकाला नोटीस मिळूनही त्याने नागरिकांना माहिती दिली नाही त्याला अटक करण्यात आली आहे आणि अशा घटकांवर भविष्यातही कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com