संकटकाळातील हक्काचा माणूस

संकटकाळातील हक्काचा माणूस

Published on

संकटकाळातील हक्काचा माणूस
जुईनगरच्या अविनाशने जपला समाजसेवेचा वसा
मनोज दातखिळे ः सकाळ वृत्तसेवा
जुईनगर, ता. ३० : संकटकाळात अनेकदा ईश्वराचा धावा सुरू होतो. अशावेळी कोणी मदतीला आला तर देवानेच पाठवल्याची भावना व्यक्त होते. त्यामुळे कोरोनाकाळ असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती जुईनगरमधील अविनाश भालसिंगचा समाजसेवेचा ध्यास पाहता त्याची ‘संकटकाळातील हक्काचा माणूस,’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
संकटकाळात सुखरूप घरी पोहोचावे, असे प्रत्येकाला वाटते. अशावेळी प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्याची धडपड करीत असतो. मात्र जुईनगर येथे राहणारा अविनाश भालसिंग हा तरुण अशा प्रवृत्तीविरोधातच आहे. किशोरावस्थेपासूनच मदत करण्याच्या इच्छेमुळे अविनाश त्याच्या मित्रांबरोबर एसव्ही सेवा मंडळाच्या रूपाने अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनाकाळात लोकांना भाजीपाला, भिक्षेकऱ्यांना अन्न पुरवण्याचे काम त्याने केले. नेरळ शिवाजीनगर परिसरात पावसात छत कोसळलेल्या दोन जोडप्यांच्या मदतीला धावून गेला. तर जुईनगरमधील विजय कदम यांच्या मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ५५ हजारांचा निधी त्यांनी दिला. याचबरोबर पावसाळ्यात अडकलेल्या वाहनांना मदत करून बाहेर काढणे, परिसरात झाड कोसळल्यास संबंधित यंत्रणांना संपर्क करून झाडाची विल्हेवाट लागेपर्यंत सहकार्य करणे, थंडीच्या दिवसांत आर्थिक मदत उभी करून गरजू लोकांना कानटोपी, ब्लॅंकेटचे वितरण करणे, अशा विविध उपक्रमांतून त्याने अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
------------------------------------------
वडिलांचा आदर्श
जुईनगर परिसरात संकटात धावून जाणारा अविनाश अशी त्याची ओळख झाली आहे. कोणत्याही संकटात अविनाश म्हणजे हक्काचा माणूस असा त्याचा परिचय आहे. वडिलांमुळे सामाजिक कार्याची आवड लागली असून, यात कोणताही वेगळेपणा वाटत नसल्याचे तो आवर्जून सांगतो.
---------------------------------------
अनेकांसाठी प्रेरणा
मूळचा अहमदनगर येथील वाळकी गावचा असलेला अविनाश वडिलांच्या नोकरीनिमित्त जुईनगर येथील शिवप्रेरणा सोसायटीत राहण्यास आला. शिरवणेत प्राथमिक शिक्षणानंतर बीएमएसपर्यंतचे शिक्षण घेऊन बेस्ट उपक्रमात क्लार्क पदावर रुजू झाला. वयाच्या १५ वर्षांपासून लोकांच्या संकटांमध्ये धावून गेला आहे. त्याची मदत करण्याची हीच वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com