अतिधोकादायक इमारती तातडीने रिक्त कराव्यात

अतिधोकादायक इमारती तातडीने रिक्त कराव्यात

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : धोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी संपर्क साधून त्या रिक्त करण्यासाठी विनंती केली होती, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही इमार रिकामी झालेली नाही. आपली इमारत रिकामी केल्यानंतर ती कोणाला देतील का? अशी भीती अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही. त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील, असे आश्वासन आता पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट करित, अतिधोकादायक इमारती खाली करण्याचे आवाहन केले आहे.

विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा प्रशासनाकडून पुन्हा आढावा घेण्यात आला. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात, असे शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, त्याबद्दलही रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगररचना सहायक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त सचिन सांगळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ९३ अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी ५६ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित ३७ इमारतींमध्ये एकूण १९१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते. ते फलक पुन्हा लावण्यात यावेत. तसेच, धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात, याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी. रहिवाशांचे व्हाॅट्सअप ग्रुप करून त्यावरही त्यांना ही माहिती द्यावी. इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही रहिवाशांपर्यंत पोहोचवावे, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

रहिवाशांशी सातत्याने संपर्कात रहावे!
अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांशी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी सातत्याने संपर्कात रहावे. त्यांना इमारती रिक्त करण्याविषयी विनंती करून इमारतीच्या ताब्याविषयी आश्वासत करावे. अतिधोकादायक इमारतीत राहणे जीवावर बेतू शकते, याची त्यांना कल्पना द्यावी, असेही राव यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

दुरुस्ती काळात इमारतीत वास्तव्य नको
सी वन वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती पूर्णपणे रिक्त करणे आवश्यक आहे. तर, सी टू ए आणि बी या वर्गवारीतील धोकादायक इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक असते. दुरुस्ती काळात या धोकादायक इमारतीत कोणी वास्तव्य करू नये, याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी. संबंधित इमारतीवर फलक पुन्हा लावण्यात यावेत, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.

नौपाडा-कोपरीमध्ये सर्वाधिक धोका
महापालिकेच्या नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक अतिधोकादायक इमारतींची संख्या आहे. वागळे इस्टेट, लोकमान्य नगर-सावरकर नगर, माजीवडा-मानपाडा, वर्तकनगर, कळवा या प्रभाग समितींमध्ये एकही अतिधोकादायक इमारत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसते.

अतिधोकादायक इमारतींची प्रभाग समितीनिहाय संख्या
प्रभाग समिती अतिधोकादायक इमारती
नौपाडा-कोपरी २७
उथळसर ०७
दिवा ०२
मुंब्रा ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com