श्रीवर्धन प्रशासकीय भवनात पाण्याची टंचाई
श्रीवर्धन प्रशासकीय भवनात पाणीटंचाई
नागरिकांसह कर्मचाऱ्यांची गैरसोय; उपाययोजना करण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. ३० (वार्ताहर) : श्रीवर्धन येथील मध्यवर्ती प्रशासकीय भवनात पाण्याचा तुटवडा असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुबलक पाणी असताना, तळमजल्यावरील नऊ कार्यालयांसाठी पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रसाधनगृहात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि अपंग व्यक्तींची गैरसोय होत आहे.
२०१० रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते या प्रशासकीय भवनचे उद्घाटन करण्यात आले. सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांची धावपळ कमी झाली होती. सुरुवातीला बोअरवेलमुळे पिण्याच्या पाण्यासह प्रसाधनगृहांसाठी सुविधा उत्तम होत्या. परंतु काही वर्षांतच तळमजल्यावरील टाक्यांचा पाणीपुरवठा बंद झाला. सध्याही जलवाहिन्या व टाक्या व्यवस्थित असूनही त्या पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत.
तळमजल्यावरील तहसील कार्यालय, पुरवठा शाखा, संजय गांधी योजना शाखा, अभिलेख कक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय, निवडणूक शाखा, कृषी अधिकारी आणि दुय्यम निबंधक अशा नऊ महत्त्वाच्या कार्यालयांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. नागरिकांना नैसर्गिक विधीसाठी पहिल्या मजल्यावर जावे लागते. ज्येष्ठ, गरोदर महिला आणि दिव्यांगांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत आहे. दरम्यान, पाण्याअभावी तळमजल्यावरील पुरुष प्रसाधनगृह मलमूत्राने भरले असून, साठवण टाकीला तडे गेल्याने दुर्गंधी पसरली आहे. महिला प्रसाधनगृहाचीही स्थिती अत्यंत दयनीय आहे.
सध्या इमारतीतील असमान पाणीपुरवठा आणि प्रसाधनगृहातील अस्वच्छता ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अन्यथा येत्या काही दिवसांत ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते.
...............
कोट
टाक्यांची जलवाहिनी खंडित झाली असेल अथवा गळती लागली असल्यास त्याची दुरुस्ती करण्यात येईल. प्रसाधनगृहांची लवकरच स्वच्छता करण्यात येईल. परंतु प्रसाधनगृहांची स्वच्छता याबाबतीत तळमजल्यावरील नऊ कार्यालयांनी जबाबदारी घ्यायला हवी. या कार्यालयांनीही आळीपाळीने स्वच्छता कर्मचारी नेमायला हवे.
- तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.