विरार-अलिबाग मल्टीकॉरिडॉरला गती
विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉरला गती
‘बीओटी’ला राज्य सरकारकडून मंजुरी
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : आर्थिक निधीअभावी रखडलेल्या विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या कामाला आता गती येणार आहे. कर्ज मिळवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने राज्य सरकारने आता हा प्रकल्प ‘ईपीसी’ऐवजी बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) याआधी राबवलेली ईपीसी निविदा प्रक्रिया रद्द करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही अतिरिक्त आर्थिक भराशिवाय ‘एमएसआरडीसी’ला हा प्रकल्प पूर्ण करणे शक्य होणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वाहतुकीला चालना मिळावी, म्हणून एमएसआरडीसीने विरार-अलिबाग मल्टिकॉरिडॉर उभारण्याचे नियोजन केले आहे. सुमारे १२६.३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या तालुक्यातून जाणार आहे; मात्र दहा वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने या प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाला हमी दिलेली असतानाही कर्ज मिळवताना एमएसआरडीसीसमोर अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे हा प्रकल्प ईपीसी तत्त्वावर करण्यासाठी काढलेल्या निविदा रद्द केल्या आहेत. तसेच बीओटी तत्त्वावर प्रकल्प करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली हा ९६ किलोमीटरचा मल्टिकॉरिडॉर उभारण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.
भूसंपादनासाठी मान्यता
राज्य सरकाराने मल्टिकॉरिडॉरची भूसंपादनाची कार्यवाही तत्काळ हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी २२,२५० कोटी रुपयांच्या रकमेस आणि त्यावरील संभाव्य व्याजालाही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाकरिता प्रशासकीय मान्यता, वित्तीय नियोजन व वित्तीय आराखडा, प्रारूप निविदा प्रपत्रे, सवलत करारनाम्याचा मसुदा महामंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर सरकारच्या मंजुरीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमित पद्धतीप्रमाणे निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
हे मार्ग जोडले जाणार
- जे.एन.पी.टी.
- प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू)
- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८
- कल्याण- मुरबाड- निर्मळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१
- तळोजा बायपास
- मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे
- मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४८
- पनवेल-उरण राष्ट्रीय महामार्ग क्र. ४
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ या महत्त्वाच्या रस्त्यांना व ठिकाणांना जोडणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.