गणेशोत्सवात फळांच्या मागणीत वाढ

गणेशोत्सवात फळांच्या मागणीत वाढ

Published on

गणेशोत्सवात फळांच्या मागणीत वाढ
दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळ बाजारात गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याने दरही चांगलेच वाढले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून मंदावलेला बाजार आता पुन्हा गतीमान झाला आहे.
सध्या फळांची घाऊक आवक चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये डाळिंबाची एक हजार क्विंटल, मोसंबीची दीड हजार क्विंटल, संत्र्यांची २०० ते ३०० क्विंटल, तर सिताफळांची २०० क्विंटल आवक झाली आहे. याशिवाय ड्रॅगन फळ सुमारे ५० क्विंटल आले असून पेर, चिकू, नासपती यांसारखी पावसाळी फळेही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र मागणी जास्त असल्याने दरांमध्ये ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारातील दर एपीएमसीपेक्षा लक्षणीय वाढलेला दिसून येत आहे. सध्या सफरचंद ८० ते १५० रुपये किलो, डाळिंब ८० ते १६० रुपये किलो, सिताफळ ६० ते ९० रुपये किलो, पेरू २५ ते ५० रुपये किलो, मोसंबी २५ ते ५० रुपये किलो, तर ड्रॅगन फळ १०० ते १५० रुपये किलो इतके दर आहेत. किरकोळ बाजारात ग्राहकांना एपीएमसीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, गणेशाच्या पूजनासाठी आणि नैवेद्यासाठी फळांना नेहमीच मागणी असते. विशेषतः सफरचंद, डाळिंब, संत्री यांची जास्त खरेदी केली जाते. त्यामुळेच आवक वाढली असली तरी भाव कमी झालेले नाहीत. गणेशोत्सव संपेपर्यंत फळांच्या दरात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे व्यापारी अशोक पुंडे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली भाववाढ ग्राहकांच्या खिशाला ताण देणारी ठरत आहे.
..........
पुष्पहार, गजऱ्यासह फुलांची शंभरी पार
-गणेशोत्सवानिमित्त पुष्पहार, गजरे आणि वेण्या यांची मागणी वाढली आहे. मात्र फुलांच्या दरात वाढ झाल्याने नवी मुंबईतील बाजारात मध्यम आकाराच्या हाराचे दर ५०-१०० वरून २५०-३०० रुपयांवर पोहचले आहेत. तर २० रुपयांनी मिळणाऱ्या गजऱ्याचा दर १०० रुपयांवर आहे. त्याचप्रमाणे वेणीच्या दरातही वाढ झाली आहे. ऐन सणासुदीत पुष्पहार, गजऱ्यासह फुलांची शंभरी पार झाली तरीही गणेश भक्तांच्या खरेदीचा उत्साह कायम आहे. हार, फुले खरेदीसाठी भक्तांनी बाजारात गर्दी केली आहे. तसेच जास्वंद, दूर्वा, केवडा आणि शमीच्या पानांनाही मागणी आहे. दुर्वांची एक जुडी १० ते १५ रुपयाला मिळत आहे. अनेक गणेशभक्तांनी यंदा खऱ्या फुलांचे मखर बनविण्याला प्राधान्य दिल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होत असली तरीही फुलांचा दरवळ चांगलाच महागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com