मराठा आंदोलकांना पालिकेने दिल्या सोयीसुविधा

मराठा आंदोलकांना पालिकेने दिल्या सोयीसुविधा

Published on

मराठा आंदोलकांना पालिकेने दिल्या सोयीसुविधा
फिरती शौचालये, पाणी, आरोग्य सेवा, कर्मचाऱ्यांची टीम तैनात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दिवसभर फोर्ट परिसर बंद ठेवण्यात आल्‍यामुळे आंदोलकांची उपासमार झाली. त्यामुळे टीका होताच मुंबई महानगरपालिकेने आज विविध नागरी सेवा आणि सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. पावसामुळे मैदानात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाजाचे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे. या आंदोलकांची पाणी, शौचालय, प्रकाश योजना, आरोग्य सेवा आदींची हेळसांड होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने व्यापक नागरी सेवासुविधांची सोय केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. २९) जोरदार पावसामुळे मैदान आणि परिसरात चिखल झाल्याने प्रवेशमार्गात अडथळे निर्माण झाले होते.
पालिकेने तातडीने चिखल हटवून त्या मार्गावर दोन ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला आहे. आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाशयोजना व्हावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत. तसेच ११ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स मैदानात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर्स मागविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

स्वच्छता कर्मचारी तैनात
आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी पालिकेचे कर्मचारी सतत तैनात ठेवण्यात आले आहेत.

आंदोलकांच्या आरोग्याची काळजी
वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, चार वैद्यकीय पथके व दोन रुग्णवाहिका मैदान परिसरात २४ तास कार्यरत आहेत. तसेच १०८ रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शौचालयांची सोय
आंदोलकांना अडचण येऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानातील आत २९ शौचकूप असलेले शौचालय विनामूल्य उपलब्ध आहे. महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी १० शौचकूपे असलेली तीन फिरती शौचालये आहेत. मेट्रो साइटशेजारी १२ पोर्टेबल शौचालये तसेच अतिरिक्त सोय केली आहे. फॅशन स्ट्रीट पदपथ व आजूबाजूचा परिसर मिळून तब्बल २५० शौचकूपांची सोय आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध आहे. पैसे द्या आणि वापरा या तत्त्वावरील तसेच इतर सार्वजनिक शौचालयेही आंदोलकांसाठी मोफत ठेवण्यात आली आहेत.
.................
धूरफवारणी
पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन कीटकनाशक धूरफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन पथके कार्यरत ठेवली आहेत. इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी केली जात असून, नजीकच्या कार्यालयांतून अतिरिक्त कर्मचारी व कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com