जेएनपीए मार्गावर वाहतूक कोंडी
जेएनपीए मार्गावर वाहतूक कोंडी
मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका; वाहतूकदारांना भुर्दंड
उरण, ता. ३० (वार्ताहर) ः मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासूनच जेएनपीए बंदरातून जाणारे सर्व मार्ग बंद झाल्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले. शिवाय त्याचा फटका अंतर्गत वाहतुकीलादेखील बसला. शिवाय जेएनपीएअंतर्गत असणाऱ्या कंटेनर चालकांना वेळेवर न पोहचल्यामुळे विविध चार्जेस भरावे लागल्याने त्यांना अतिरिक्त आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर धुतुम, चिर्ले ते गव्हाण फाटा अशा तब्बल १२ ते १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर कंटेनर वाहनांची रांग लागली होती. उरण शहराकडे जाणारे सर्व मार्गही बंद झाल्याने प्रवासी आणि व्यवसायीकांना किमान चार ते पाच तास वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागले. मराठा आंदोलकांचा ताफा मुंबईकडे जाण्यासाठी जेएनपीए महामार्गकडे वळल्यामुळे सर्व अवजड वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे विशेषत: जेएनपीएच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला होता. कंटेनर वाहने विलंबाने पोहोचल्यामुळे निर्यात व आयातीच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला, तसेच शटआऊटस देखील प्रभावित झाले. या परिस्थितीमुळे वाहतूकदारांना अतिरिक्त आर्थिक फटका बसला असून, कोंडीमुळे वाहन चालकांचा मनस्ताप वाढला आहे.
.........................
कोंडीमुळे प्रवासी नोकरवर्गालादेखील चांगलाचा फटका बसला. त्यांचीदेखील वाहने कोंडीत अडकून पडली होती. विशेष म्हणजे काही वाहनांना चक्क जेवणपुरवठा करावा लागला, तसेच वाहने रांगेतून सोडवण्यासाठी उरण, न्हावाशेवा आणि गव्हाण फाटा येथील वाहतूक विभागातील अधिकारी वर्गातून सतत प्रयत्न सुरू होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर वाहनांच्या तीन-तीन रांग लागल्या होत्या. यातील एक रांग सुरळीत करण्यात उरण वाहतूक पोलिस यशस्वी ठरले, मात्र संपूर्ण कोंडी दूर करण्यात बराच वेळ लागला.
..........................
कोट
जेएनपीए मार्गावर अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाहतूक कोंडी होते. मात्र या वाहतूक कोंडीचा फटका वाहतूकदारांना भोगावा लागला आहे. कंटेनर वेळेवर न पोहचल्यामुळे जे चार्जेस लागतात तेही आमच्यावर पडतात. अशा कोणत्याही कारणाने पोर्टची वाहतूक बंद न ठेवता सुरळीत ठेवावी, जेणेकरून वाहतूकदारांना भुर्दंड बसणार नाही.
- पंढरीनाथ गांजवे, रायल ट्रान्सपोर्ट प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.