थोडक्यात बातम्या रायगड
रोह्यात चित्रकला, बुद्धिबळ स्पर्धेला प्रतिसाद
रोहा, ता. ३१(बातमीदार) ः सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहातर्फे दरवर्षी विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये चित्रकला, बुद्धिबळ आणि श्लोक पाठांतर स्पर्धा या तीन प्रमुख स्पर्धां पार पडल्या. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते प्रौढ गटांपर्यंत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त व उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्तम नियोजन, शिस्तबद्ध वातावरण आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत रंगतदार झाला.
चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि रंगांना सुंदर अभिव्यक्ती दिली. विषयानुसार साकारलेली चित्रे पाहून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षक प्रभावित झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कुमारी भक्ती देशमुख यांनी आपली भूमिका बजावली. बुद्धिबळ स्पर्धेत अनेक तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेची कसोटी लावली. खेळाडूंनी संयम, विचारशक्ती आणि डावपेचांचा उत्तम मेळ घालून खेळ खेळला. या स्पर्धेचे परीक्षण कार्य हर्षद भाटे यांनी केले. परंपरेचा वारसा जपणारी श्लोक पाठांतर स्पर्धा ही अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडली. स्पर्धकांनी आत्मविश्वासाने, स्पष्ट उच्चारांनी आणि भावपूर्ण पद्धतीने श्लोकांचे पठण केले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून विजया गोखले यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये स्पर्धकांची चुरस दिसून आली आणि परीक्षकांना निकाल लावणे अत्यंत कठीण गेले. तरीदेखील सुस्पष्ट निकषांच्या आधारे प्रत्येक गटामध्ये तीन पारितोषिके निश्चित करून विजेत्यांना अध्यक्ष अमेय जोशी, परीक्षक भक्ती देशमुख, तितीक्षा जोशी, अपूर्वा शिंदे, अमन सिंग आदी मान्यवऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
.............
श्रीवर्धनमध्ये मनोविकार ग्रस्त रुग्णांची संख्या चिंताजनक
श्रीवर्धन (वार्ताहर) ः गेल्या काही महिन्यांपासून श्रीवर्धन तालुक्यात अनोळखी मनोविकार ग्रस्त व्यक्तींची संख्या वाढत आहे. या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्मशानभूमी, बसथांबे, बंद घराची पडवी व आवार, निर्मनुष्य रस्ते आदी मनोरुग्णांचे निवासस्थान झाले आहे. तालुक्यात आलेले हे अनोळखी मनोरुग्ण सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. पोलिस प्रशासनाने सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या मनोरुग्णांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनोळखी मनोरुग्ण व्यक्तींच्या वाढीने एक संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. हे मनोरुग्ण श्रीवर्धन तालुक्यातील नसून परभाषिक व्यक्ती असल्याचे निदर्शनास येत आहे. यातील अनेक मनोरुग्ण व्यक्तींना हिंदी भाषा ही अवगत नसल्याचे स्थानिकांना जाणवले. परभाषिक मनोरुग्ण व्यक्ती श्रीवर्धन तालुक्यात कशा पोहोचतात किंवा त्यांना येथे आणून कोण सोडून जाते, हेही एक गुढ असल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळी समाजसेवकांनी मरणासन्न अवस्थेतील मनोरुग्ण व्यक्तीला रुग्णालयात वेळेत दाखल करीत जीवदान दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.