चणेरा उसरमार्गे रोहा रस्त्याच्या कामासाठी आंदोलन
चणेरा- उसरमार्गे रोहा रस्त्याच्या कामासाठी आंदोलन
पाच कोटींचा निधी मंजूर, तरीही कामाला विलंब
रोहा, ता. ३१ (वार्ताहर) : रोहा आणि मुरूड या दोन तालुक्यांमधील अंतर कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा चणेरा- उसरमार्गे रोहा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. या रस्त्यामुळे रोहा- चणेरा हा १९ किलोमीटरचा प्रवास तब्बल १० किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवास सुलभ होणार असून परिसरातील पर्यटनस्थळे आणि पंचक्रोशीतील सुमारे ५० गावे रोह्याशी अधिक वेगाने जोडली जाणार आहेत; मात्र अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता आजही अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून, आज पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करून ग्रामस्थांनी सुस्त प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी केले. या वेळी पंचक्रोशीतील सुरेश मोरे, अनिल साळावकर, शंकर दिवकर, पराग घाग, समीर वारगुडे, मनोज भायतांडेल, अरुण खानविलकर, गोपाळ धारपवार, मजिद भुरे, गजानन साळवी, चंद्रकांत चौलकर, गोपीनाथ देवळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदनही देण्यात आले होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रोहा रेल्वेस्थानकापासून अलिबाग, मुरूड, फणसाड अभयारण्य, काशिद बीच, रेवदंडा आणि साळावचे गणपती मंदिर या पर्यटनस्थळांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर न्हावे आणि रोहा येथे घोषित केलेल्या ग्रोथ सेंटरच्या विकासाला या रस्त्यामुळे गती मिळणार आहे. त्यामुळे हा रस्ता स्थानिकांसाठी जीवनवाहिनी ठरणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
................
डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन
ग्रामस्थ प्रकाश विचारे यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले, की पाच कोटींचा निधी मंजूर होऊनही कामाला सुरुवात होत नाही. जर डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्टीकरण देताना सांगितले, की या रस्त्याचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार होते; परंतु पावसाळा लवकर सुरू झाल्याने विलंब झाला. आता पावसाळ्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण होईल, असे आश्वासन विभागाचे उपअभियंता विजय बागुल यांनी दिले. दरम्यान, हे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.