भाजपा शिंदे गटात सत्तासंघर्ष अटळ

भाजपा शिंदे गटात सत्तासंघर्ष अटळ

Published on

भाजपा-शिंदे गटात सत्तासंघर्ष अटळ
पक्ष प्रवेशावरून जोरदार रस्सीखेच सुरु
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणुका होणार आहेत. या नव्या प्रभाग व्यूहरचनेत आपण कसे वरचढ राहू आणि कोणत्याही प्रभागात तगड्या उमेदवाराची कमी पडता कामा नये यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपने ठाकरे गट, मनसे, कॉग्रेसमधील जुने जाणते माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. सत्तेची समीकरण आपल्या बाजूने फिरवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. पितृपंधरवड्यानंतर पक्ष प्रवेशाच्या हालचाली आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची पकड राहिली आहे. मात्र, शिवसेनेतील फूट आणि शिंदे गटाच्या उदयानंतर शिवसेनेच्या गोटात मोठे राजकीय बदल घडले आहेत. आता शिंदे गटाला महापालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवायची आहे. दुसरीकडे भाजपने डबल इंजिन सरकारची ताकद दाखवत महापालिकेत वर्चस्व मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत सत्तेसाठी मोठी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
शिंदे शिवसेनेतून कल्याण, डोंबिवली भाजपमधील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वेगळ्या वळणाने आपल्या पक्षात घेण्यासाठी गळ टाकले आहेत. तर, भाजपने शिंदे गटातील डोंबिवलीतील काही मातब्बर आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कल्याण ग्रामीणमधील ठाकरे गटातील काही हुकमी मंडळींनी भाजपमध्ये येण्याची तयारी केली होती. पक्षप्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा सुरू असतानाच आदल्या रात्रीच चक्रे फिरली आणि या मंडळींनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळते की नाही या विषयावर भाजपमधील काही मंडळी वळचणीवर बसून आहेत. राज्यात सत्तेत, स्थानिक पातळीवर शिंदे सेना, भाजप नेते व्यासपीठावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असले तरी दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस टोकाला गेली आहे. हे ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक करत असलेल्या विधानांवरून दिसते.
कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या सर्व सुप्त हालचालींची माहिती शिंदे आणि भाजपच्या नेत्यांना ज्ञात आहे. मात्र, या विषयावर दोन्ही पक्षाचे नेते मौन बाळगून आहेत. राज्यात पक्षीय वर्चस्वाची गणिते जुळविताना आपल्या शहरात वरचष्मा असावा यादृष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालिकेवर भाजपचा महापौर बसविण्याचे आणि शहर भाजपमय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हेच विधान पकडून शिंदे सेनेने मागील २५ वर्ष पालिकेवर असलेले वर्चस्व तसूभरही कमी पडू नये म्हणून आपली ताकद या भागात पक्षप्रवेशाच्या माध्यमातून दाखवत आहेत.
आतापर्यत भाजपने शिंदे सेनेतील आणि शिंदे गटाने भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांना घ्यायचे नाही, हे सूत्र दोन्ही गटाकडून पाळले जात आहे. परंतु, निवडणुकांदरम्यान महायुतीपेक्षा पक्ष मोठा या विचारातून दोन्ही पक्षांकडून कार्यकर्ते पळवापळवीचे प्रमाण वाढेल आणि त्यात भाजप-शिंदे सेनेतील संघर्ष अटळ असेल, असे राजकीय जाणकार सांगतात. पालिका निवडणुकीतील निकालावरून केवळ सत्ता कोणाच्या हाती येणार हेच नाही, तर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये कोण वरचढ ठरणार हेही स्पष्ट होणार आहे.

पॅनल पद्धतीने निवडणुका
यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणुका होत असल्याने पारंपरिक समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पॅनलमध्ये एका पक्षाचे दोन उमेदवार उभे राहणार असल्याने पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवारांची व्यक्तिशः ताकद आणि संघटनशक्ती महत्त्वाची ठरणार आहे.

बंडखोरीची भीती
दोन्ही पक्षांमध्ये पक्ष प्रवेशाची रस्सीखेच आहे. तिकिटाच्या आशेने कार्यकर्ते देखील इकडून तिकडे उड्या मारत आहेत. परंतु कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. तिकीट न मिळाल्यास बंडखोरीचा भडका उडण्याची भीती असून, त्याचा निवडणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो. याचा फायदा मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह स्थानिक संघटनांना मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com