कल्याण-डोंबिवलीत ६ हजार ५०२ गौराईंची स्थापना

कल्याण-डोंबिवलीत ६ हजार ५०२ गौराईंची स्थापना

Published on

सोनपावलांनी गौराईचे आगमन
कल्याण-डोंबिवलीत सहा हजार ५०२ गौराईंची स्थापना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३१ ः कल्याण-डोंबिवली शहर व ग्रामीण भागात बुधवारी गणेशचतुर्थी दिनी गणरायाचा जयघोष करत ५२ हजार ४७८ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तर रविवारी (ता. ३१) सहा हजार ५०२ गौराईंची मनोभावे स्थापना करण्यात आली. सोनपावलांनी आलेल्या गौराईंना पाना-फुलांनी सजवून स्थानापन्न केल्यानंतर गोडधोड नैवेद्य दाखवून सुवासिनींना भोजन दिले जाते.
भाद्रपद महिन्यात शुक्ल अष्टमीला गौराईंचे पूजन केले जाते. गौराईंचे आगमन गणेशचतुर्थीच्या चार दिवसांनी होते. गौरी-गणपतीचा सण साजरा करण्याच्या प्रथा वेगवेगळ्या प्रांतानुसार आहेत. हा सण साजरा करण्यामागे आख्यायिका आणि मान्यता देखील वेगवेगळ्या आहेत. काही मान्यतांनुसार गौरीला श्रीगणेशाची बहीण मानले जाते, तर प्रचलित दंतकथांनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि ती श्रीगणेशाची माता आहे. काही लोक या सणाला महालक्ष्मी पूजा देखील म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा-अर्चना करतात.

फुले खरेदीसाठी गर्दी
कल्याण-डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात गौरीच्या पूजनासाठी लागणारी शेंदुर्ली, कळलावी आदी फुलांच्या खरेदीसाठी महिला ग्राहकांची झुंबड उडाली होती. गौरीच्या फुलांची एक जुडी दीडशे रूपयांना विकली गेली. कल्याण, डोंबिवलीत गौरीची फुले, त्यांचा वेल आणि त्यामध्ये मंगळगौरीची फुले असा जुडगा १५० रूपयांना विकला जात आहे.

केळीच्या पानाची मागणी वाढली
अंबरनाथ, बदलापूर, मलंगगड, भिवंडीजवळील पिंपळास परिसरातून अनेक महिला गौरीची फुले, केळीची पाने, अळूची पाने, गौरीला प्रसादासाठी लागणाऱ्या रानभाज्या घेऊन बाजारात सकाळपासून दाखल झाल्या होत्या. गणेशोत्सव काळात केळीच्या पानावरील भोजनाला अधिक पसंती दिले जाते. त्यामुळे बाजारात केळीची पाने ५० रूपयांना तीन या दराने विकली जात आहेत.

अळूच्या पानांना अनन्य साधारण महत्व
या व्यतिरिक्त गौरी-गणपती सणात अळूच्या पानांना अनन्य साधारण महत्व आहे. अळूच्या पानांची जुडी २० ते ३० रूपयांना विकली गेली. आदिवासी भागातील महिला गौरीची फुले, अळूची पाने, शेंदुर्लीची फुले घेऊन विक्रीसाठी आल्या होत्या. या महिलांकडून गौरीची फुले ५० रूपये जुडीप्रमाणे विकली गेली. अळूची पाने २० रूपये जुडीप्रमाणे विकली गेली. या व्यतिरिक्त गावरान पिकवलेली काकडी, हिरवी भेंडी, पांढरी भेंडी, शिराळी, करटोली बाजारात विक्रीसाठी आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com