मराठा आंदोलकांसाठी महापालिकेची अत्यावश्यक सुविधा
मराठा आंदोलकांसाठी महापालिकेची अत्यावश्यक सुविधा
वाशी, ता. ३१ (वार्ताहर) ः मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते नवी मुंबईत दाखल झाले आहेत. हे आंदोलनकर्ते सिडको एक्झिबिशन सेंटर आणि एपीएमसी मार्केट परिसरात मुक्कामी असून, त्यांच्या सोयीसाठी नवी मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये पाणी, शौचालय, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.
सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी १० टँकरच्या माध्यमातून सुमारे तीन लाख लिटर पाण्याचा साठा करण्यात आला आहे. अंघोळीकरिता १५० नळ बसवण्यात आले आहेत. तसेच कांदा-बटाटा मार्केट परिसरात १० हजार लिटर क्षमतेचे चार टँकर उपलब्ध आहेत. आतापर्यंत एकूण २०० टँकर पाणीपुरवठा करण्यात आला असून, गरजेनुसार अतिरिक्त टँकरही उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. शौचालय व्यवस्थेत २५० शौचालयांची सोय असून त्यांची स्वच्छता करण्यासाठी ३० कर्मचारी, पाच सक्शन मशीन आणि अभियंते ड्युटीवर आहेत. स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत, तर कचऱ्याच्या व्यवस्थेसाठी सहा वाहने काम करीत आहेत. कांदा-बटाटा मार्केट परिसरात दहा कर्मचारी आणि दोन कचरा वाहने तैनात आहेत. सॅनिटरी अधिकारी आणि निरीक्षक या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. वैद्यकीय सुविधांसाठी एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन रुग्णवाहिका, डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाशी टोलनाका आणि कांदा-बटाटा मार्केट येथे प्रत्येकी एक रुग्णवाहिका तैनात आहे. याशिवाय सर्व पालिका रुग्णालयांमध्ये आंदोलकांसाठी २० बेड राखीव ठेवले आहेत. महापालिकेच्या या तत्पर सेवेमुळे आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आम्ही गावाहून आलो असून एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना पाणी, शौचालय आणि औषधांची सोय मिळत आहे. पालिका वेळोवेळी मदत करीत आहे, असे एका आंदोलनकर्त्याने सांगितले.
.................
विशेष सूचना
कोणत्याही अडचणीसाठी आपत्कालीन कक्ष क्रमांक ०२२-२७५६६०/६१ किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२२२३०९/१० वर संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.