उरण-दिघोडे दास्तान रोडवर वाहतूक कोंडी
उरण-दिघोडे दास्तान रोडवर वाहतूक कोंडी
रुग्णवाहिका कलंडली; प्रवाशांचा संताप
उरण, ता. ३१ (वार्ताहर) ः उरण-दिघोडे-दास्तान रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली असून, या समस्येमुळे शनिवारी (ता. ३०) रात्री जीवघेणा प्रसंग ओढवला. एका गंभीर आजारी महिलेला उपचारासाठी मुंबईला नेणारी रुग्णवाहिका या कोंडीत अडकली. या परिस्थितीत वाहनचालकाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने ती पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अपघात टळला. मात्र या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. खड्डेमय रस्ते, अयोग्य नियोजन, बेकायदा कंटेनरचे पार्किंग यामुळे उरणमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे जेएनपीए बंदरातून अवजड वाहतूक दिवसाच्या वेळी बंद करण्यात आली आहे. यामुळे दिवसभर रस्त्याच्या कडेला कंटेनर आणि ट्रेलर उभे राहतात. रात्री वाहतुकीची परवानगी मिळाल्यानंतर या वाहनांचा लोंढा रस्त्यावर येतो. त्यातच गव्हाणफाटा-चिरनेर, दिघोडे-दास्तान आणि खोपटे-कोप्रोली रस्त्यांची दुरवस्था झाल्याने गाड्यांचा वेग प्रचंड मंदावतो. त्यामुळे ग्रामीण भागात रोजच वाहतूक कोंडीचे चित्र दिसते. दरम्यान, शनिवारी रात्री दिघोडे-दास्तान मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडली होती. गव्हाणफाटा-चिरनेर रस्त्यावर तर कंटेनर-ट्रेलरच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. अशात कोकणातून आलेली रुग्णवाहिका दिघोडे येथे अडकली. वेळ न घालवता चालकाने एका लेनमधून विरुद्ध दिशेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यातच वाहन घसरून रस्त्याच्या कडेला कलंडले. जोरदार पावसामुळे टोइंग व्हॅन वेळेवर पोहोचू शकली नाही. मात्र घटनास्थळी असलेल्या वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तत्काळ मदत केली. त्यांनी रुग्णवाहिकेतील महिलेला बाहेर काढून सुरक्षित केले आणि वाहनाला पट्ट्या बांधून पुन्हा रस्त्यावर आणले. मोठ्या प्रयत्नानंतर रुग्णवाहिका जेएनपीए मार्गावर पोहोचली.
................
उपाययोजनेची गरज
या घटनेने उरण तालुक्यातील वाहतूक व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीचा आरोप केला आहे. प्रवासी नीलेश ठाकूर यांनी सांगितले, की दिघोडे-दास्तान रस्त्यावर रोजच कोंडी होते. शनिवारी तर १० मिनिटांचा प्रवास चार तासांत पार पडला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

