निवडणुकीपूर्वीच इच्छुकांची दमछाक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे महापालिकेने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेचीच ही झेरोक्स कॉपी मानली जात आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत, पॅनलमध्ये कोणताही बदल नाही. २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरून हा आराखडा तयार केला असला तरी यामध्ये सात प्रभाग असे आहेत, ज्यांची लोकसंख्या ६० हजारांच्या पुढे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत येथे नगरसेवकांची संख्या वाढण्याची गरज होती, मात्र तसे न झाल्याने आगामी निवडणुकीत इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहचताना दमछाक होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता वेध महापालिका निवडणुकांचे लागले आहेत. २०२२ पासून ठाणे महापालिकेची सत्ता प्रशासकाच्या हाती असून निवडणुकांकडे माजी नगरसेवकांपासून इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. न्यायालयाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका निर्धारित वेळेत घेण्याचे आदेश दिल्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने कार्यक्रम लागू केला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला आहे. २०१७ नुसारच हा आराखडा असल्याने चार सदस्यांचे ३२, तर तीन सदस्यांचा १ असे ३३ प्रभाग तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्याही १३१ असणार आहे.
ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखडा २०१७ च्याच धर्तीवरचा आहे. त्यामुळे त्यात फारसा बदल नाही. यासाठी २०११ ची जनगणनेनुसार १८ लाख लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तविक गेल्या १५ वर्षांमध्ये ठाण्यात झपाट्याने नागरीकरण झाले असून नवीन ठाणे म्हणून ओळख असलेला घोडबंदर पट्ट्याची लोकसंख्या चौपटीने वाढली आहे. या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असून मतदार संख्याही त्या तुलनेत वाढली आहे.
दुसरीकडे कळवा, खारेगाव, मुंब्रा आणि दिवा या उपशहरांमध्येही लोकसंख्या वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार येथे नगरसेवकांंची संख्या वाढणे अपेक्षित होते, पण आधीच्याच पॅर्टननुसार निवडणूक लढवण्यात येणार असल्याने प्रभागांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे ३३ प्रभागांपैकी सात प्रभागांमध्ये लोकसंख्या ही ६० हजारांच्या पुढे गेली आहे. तर काही प्रभागांमध्ये लोकसंख्या ही ५७ ते ५९ हजारांच्या घरात आहे.
फुगीर प्रभाग
१८ लाख लोकसंख्या ग्राह्य धरल्यास चार सदस्य पॅनल तयार करताना किमान ४५ ते ५५ हजार लोकसंख्या असलेला एक पॅनल तयार होणे अपेक्षित आहे. जिथे सर्वाधिक लोकसंख्या आहे, तो पट्टा सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे नगरसेवकांची संख्या सीमित ठेवण्यासाठी प्रभाग फुगीर करण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कळव्यातील अशा प्रभागांवर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाराजीही व्यक्त केली होती.
सर्वाधिक लोकसंख्या असलेले प्रभाग
- प्रभाग क्रमांक ६
लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, रामबाग
लोकसंख्या ६०,२८४
- प्रभाग ९
पारसिक नगर, संघवी हिल्स, आनंद विहार, सह्याद्री, खारीगाव
लोकसंख्या ६२,२६८
- प्रभाग १५
इंदिरानगर, साठे नगर, अंबे वाडी, जय भवानी नगर
लोकसंख्या ६१,१८६
- प्रभाग २३
कळवा, मनिषा नगर, जानकीनगर
लोकसंख्या ६१,७४२
- प्रभाग २४
विटावा, भोलनगर, आनंदनगर, गणपतीपाडा
लोकसंख्या ६२,५१९
- प्रभाग २५
पौंडपाडा, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, अपर्ना राज सोसयाटी, कोकनेश्वर सोसायटी
लोकसंख्या ६२,६९८
- प्रभाग ३०
किस्मत कॉलनी
लोकसंख्या ६०,१०५
- प्रभाग ३३
चनी पाडा, देवरीपाडा, रशीद कंपाऊंड
लोकसंख्या ६१,०७७
- प्रभाग क्रमांक २
हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रम्हांड, अकबर कॅम्प
लोकसंख्या ५८,२१५
- प्रभाग ७
वर्तक नगर, रेमंड, समता नगर, ओसवाल पार्क
लोकसंख्या ५८,३९३
प्रभाग ३२
नशेमन कॉलनी, मक्सद नगर, वफा हिल्स, अॅकार्ड कॉम्पेक्स, सोनाजी नगर
लोकसंख्या ५९,५७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

