प्रिया मराठेचा अल्पपरिचय
गुणी अभिनेत्री
(प्रिया मराठेचा अल्प परिचय)
मालिका आणि चित्रपट क्षेत्रातील चर्चेतला चेहरा म्हणजे प्रिया मराठे. छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱ्या चेहऱ्याच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. एक गुणी अभिनेत्री म्हणून ती कायम लक्षात राहील.
लहानपणी प्रिया मराठेने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनिअर, डॉक्टर व्हायचं होतं. अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणे कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातील एकांकिका स्पर्धा, नाट्यस्पर्धा तसेच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातील इतर नाट्यप्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवि करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं. प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर
पदार्पण केलं. २००५मध्ये मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळून पाहिले नाही. २००७मध्ये तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं तिनं सोनं केलं. यानंतर तिने ‘जयोस्तुते’ या मालिकेत काम केले. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’ अशा काही तिच्या गाजलेल्या मालिका. ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’ या हिंदी मालिकांमुळे तिची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘१२३४’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
प्रिया मराठेने शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. मात्र आरोग्याच्या कारणामुळे तिने ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. २०१२मध्ये प्रिया मराठेने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शांतनू मोघे यांच्याशी लग्न केले. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपे म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. इतर कलाकार जसे दुसरा व्यवसाय करतात तसेच प्रियाने दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी ‘द बॉम्बे फ्राईज’ या नावाचे स्वतःचं कॅफे सुरू केले होते. एक गुणी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जात होते. छोट्या पडद्यावर ती चांगलीच लोकप्रिय अभिनेत्री होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

