निर्माते-छायाचित्रकार प्रेम सागर यांचे निधन

निर्माते-छायाचित्रकार प्रेम सागर यांचे निधन

Published on

निर्माते-छायाचित्रकार प्रेम सागर यांचे निधन

मुंबई, ता. ३१ : प्रसिद्ध दिग्दर्शक रामानंद सागर यांचे सुपुत्र प्रेम सागर यांचे आज रविवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास येथील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी त्यांची नातेवाईक मंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती.
गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. डॉक्टरांनी रविवारी त्यांना घरी हलवण्याचा सल्ला दिला होता; मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रेम सागर हे फक्त यशस्वी निर्मातेच नव्हते, तर उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सागर आर्ट्स या निर्मिती संस्थेतून अनेक मोठे प्रकल्प साकारले आणि आपल्या घराण्याचा वारसा पुढे नेला. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून त्यांनी सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले होते. रामानंद सागर यांनी तयार केलेली ‘रामायण’ मालिका १९८७मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली आणि भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. या मालिकेत त्यांचा मोलाचा वाचा होता. या मालिकेसह इतर अनेक उपक्रमांत प्रेम सागर यांनी छायाचित्रण आणि तांत्रिक बाजूंची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांनी विक्रम आणि वेताळ, अलिफ लैला, काकभूशुंडी, कामधेनू गौमाता अशा अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली. तसेच ‘हम तेरे आशिक हैं’ आणि ‘बसेरा’ यांसारख्या चित्रपटांशीही त्यांचे नाव जोडले गेले. १९६८च्या ‘आँखे’ चित्रपटात त्यांनी इलेक्ट्रिकल विभागात काम केले, तर १९७६च्या ‘चरस’मध्ये छायाचित्रकार म्हणून योगदान दिले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी क्षेत्राने एक प्रतिभासंपन्न, तांत्रिकदृष्ट्या पारंगत आणि समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com