राजकीय, प्रशासकीय निष्क्रियतेचा बळी!
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १ : ऐन गणेशोत्सवात विरारमधील विजयनगर येथील रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळल्याने १७ जणांना आपले प्राण नाहक गमवावे लागले. मूळचा देवगड तालुक्यातील ओंकार जोईल या युवकाला संपूर्ण कुटुंबाचीच आहुती द्यावी लागली. त्या दिवशी त्याच्या मुलीचा वाढदिवस, पण एका क्षणात त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. राजकीय व प्रशासकीय निष्क्रियतेमुळे अनेकांचा बळी गेल्याचा संताप व्यक्त होत आहे.
विरार, नालासोपारा, वसईसह कल्याण-डोंबिवली, बदलापूर-अंबरनाथ परिसरात मागील सुमारे २० ते २५ वर्षांत कोकणातील नवतरुण मोठ्या प्रमाणात आला आहे. अशाच अनेक इमारतींमध्ये तो आपलं घर करून राहतो आहे. पोटा-पाण्यासाठी मुंबईत मिळेल, ती नोकरी-व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. विरार ते बोरिवली-अंधेरी-चर्चगेट अशी सकाळ आणि संध्याकाळच्या धावपळीत आणि गर्दीत तो आपल्या यशसुखाची स्वप्नंही पाहतो आहे. त्याचं जीवन आधीही असुरक्षित होते. आता विरारमधील घटनेने त्याची असुरक्षितता अधिक स्पष्ट केली आहे.
विरारमधील कोपरी, चंदनसार, विजयनगर, फुलपाडा, कारगिलनगर, मनवेलपाडा, नालासोपारातील मोरेगाव, तुळिंज, विजयनगर आणि वसईतील गोखिवरेपर्यंत असा लांबलचक मोठा पट्टा आज कोकणवासीयांनी भरलेला आहे. हा भाग तिथल्या जीर्ण जर्जर इमारतींत, असुविधांच्या चाळींत आज कोकणी माणूस राहतो आहे. नाइलाजाने तो या अव्यवस्थेविरोधात आवाज उठवत नाही. ही अव्यस्था कोकणातही आहे आणि त्याने स्वीकारलेल्या शहरांतही! या अव्यवस्थेसोबत त्याचा संघर्ष सातत्याने सुरू आहे, पण कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो कर्ज घेत नाही आणि आत्महत्याही करत नाही, या गोंडस वाक्याने त्याचा स्वाभिमान शांतवला जातो आणि तोही या वाक्याने सुखावतो. किंबहुना अपरिहार्यतेमुळे ही अव्यवस्था स्वीकारतो. ओंकार जोईल हा याच अव्यवस्थतेचा बळी आहे. जीर्ण इमारतींत, चाळींत राहणारे ओंकारसारखे असंख्य तरुण आज रमाबाई अपार्टमेंटच्या पडछायेत आहेत.
चालू वर्षातील दुर्घटना
- २६ ऑगस्ट : रमाबाई अपार्टमेंट इमारतीमुळे १७ जणांचा मृत्यू व नऊ जण जखमी
- ५ जुलै : नालासोपारा अलकापुरी येथील साईराज अपार्टमेंट इमारत कोसळली.
- १९ जून : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील बावशेत पाडा येथील श्रीकृष्ण चाळीची भिंत कोसळली.
- ३० मे : विरार-एमबी इस्टेट येथील मर्चेन इमारतीमधील खोलीचा स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू.
- २६ मे : विरार-गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंटमधील सदनिकेचा स्लॅब कोसळला होता. यात महिलेचा मृत्यू.
- २१ मे : आचोळे येथील सिमरन साई या इमारतीचा स्लॅब कोसळळा. एका महिलेसह मुलाची अग्निशमन दलाकडून सुटका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.