स्पेनमध्ये गणरायाचा जयघोष
बदलापूर, ता. २ (बातमीदार) : भारतामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. विशेषतः कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्य सरकारनेही यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने हा सोहळा अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मात्र, हा उत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता परदेशातही उत्साहात साजरा होत आहे. स्पेनमधील बार्सिलोना शहरातही मराठी व भारतीय बांधवांनी गणेशोत्सवाची धूम केली.
युरोपमध्ये शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अशा उत्सवांना एकत्र येण्याचे माध्यम बनवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे परदेशातील मराठी बांधवांचाही आनंद दुणावला आहे. बार्सिलोना येथील महाराष्ट्र मंडळाने यंदा तिसऱ्या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी दहा वाजता वेदमंत्रोच्चारांच्या गजरात व पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. भारतीय वाणिज्य दूत इनबासेकर सुंदरामूर्ती आणि सहाय्यक वाणिज्य दूत सारासन यांनी उपस्थित राहून श्रींच्या आरतीत सहभाग नोंदवला.
यावेळी सामूहिक अथर्वशीर्ष पठण, बालकलाकारांकडून गणेशस्तुती वंदना, अभंग कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्थानिक परदेशी नागरिकांनीही यात सहभाग घेतला. पारंपरिक मराठी पोशाखांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले होते. बार्सिलोना शहर व परिसरातील सुमारे ४०० ते ५०० मराठी बांधवांसह भारतीय व परदेशी नागरिकांनीही गणेशोत्सवात उत्साहाने सहभाग घेतला.
किल्ल्याच्या महाद्वाराची प्रतिकृती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोने दिलेल्या जागतिक मान्यतेला अभिवादन म्हणून किल्ल्याच्या महाद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली. हा देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
बदलापूर : सातासमुद्रापार बार्सिलोना शहरात गणेशोत्सव किल्ल्याच्या महाद्वाराची प्रतिकृती उभारण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.