घणसोलीत घरभाड्यांचा भडका

घणसोलीत घरभाड्यांचा भडका

Published on

घणसोलीत घरभाड्यांचा भडका
आयटी पार्कजवळ राहणीमानातील महागाईने नागरिक हैराण
कोपरखैरणे, ता. १ (बातमीदार) ः घणसोली व महापे परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या आयटी पार्क व बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे येथील घरभाड्यांचे दर आकाशाला भिडले आहेत. वाढत्या भाड्यामुळे स्थानिक मध्यमवर्गीय नागरिकांवर आर्थिक ताण पडत असून, राहणीमानातील महागाई नागरिकांना चांगलीच चटका लावत आहे.
गेल्या काही वर्षांत महापे-घणसोली परिसरात आयटी कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशभरातून येथे नोकरीसाठी तरुण येऊ लागले असून, त्यांना राहण्यासाठी भाड्याने घरे लागतात. या वाढत्या मागणीचा थेट परिणाम घरभाड्यांवर झाला आहे.
प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन परवडणारी घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे अन्यथा स्थानिकांना या वाढत्या भाड्यामुळे परिसर सोडण्याची वेळ येईल, अशी चिंता व्यक्त होत आहे.


भाड्यांमध्ये दुप्पट वाढ
स्थानिक मालमत्ता विक्रेत्‍यांच्या माहितीनुसार, घणसोलीत १ बीएचके फ्लॅटचे भाडे काही वर्षांपूर्वी १० ते १२ हजार रुपये होते, मात्र सध्या तेच भाडे १८ ते २२ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. २ बीएचके घरांचे भाडे तर ३० ते ३५ हजार रुपये आकारले जात असून, काही प्रीमियम सोसायट्यांमध्ये हे दर ४० हजारांहून अधिक असल्याचेही समजते.

स्थानिक नागरिकांचे हाल
स्थानिक रहिवासी सांगतात, आयटी क्षेत्रातील उच्च पगारदार कर्मचाऱ्यांमुळे मालक जास्तीचे भाडे मागू लागले आहेत. याचा फटका आमच्यासारख्या स्थानिकांना बसत आहे. भाडे परवडेनासे झाले असून, काहींना परिसर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे.

राहणीमानातील एकूण महागाई
फक्त भाड्यांमध्येच नव्हे, तर दैनंदिन गरजेच्या वस्तू, खानपान व छोट्या सेवांमध्येही महागाई वाढली आहे. भाड्यांसोबतच शाळा-महाविद्यालयाच्या फी, वीजबिल व देखभाल खर्चही वाढत असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांची आर्थिक गणिते बिघडली आहेत.


तज्ज्ञांचे मत
रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, घणसोली परिसरात पुढील काही वर्षांत आणखी आयटी कंपन्या व प्रकल्प उभारले जाणार असल्याने मागणी वाढत राहील. त्यामुळे भाड्यांचे दर अजून काही काळ नियंत्रणात येण्याची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com