रेल्‍वे स्‍थानकांना समस्‍यांचा विळखा!

रेल्‍वे स्‍थानकांना समस्‍यांचा विळखा!

Published on

रेल्‍वेस्‍थानकांना समस्‍यांचा विळखा!
उरणमधील चारही स्‍थानकांमध्ये प्रवाशांची गैरसोय; ढिसाळ कारभाराचा फटका
उरण, ता. १ (वार्ताहर) ः औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या उरण तालुक्यात रेल्वेसेवा सुरू होऊन दीड वर्षेही झाले नसताना चारही रेल्‍वेस्‍थानके समस्‍यांच्या विळख्यात सापडली आहेत. रेल्‍वे प्रशासन व इतर यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून, गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
गव्हाण रेल्वेस्‍थानक अद्याप अपूर्णच आहे. उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार या चार रेल्वेस्‍थानकांमधल्या काही शौचालयांची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होते. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उरण ते नेरूळ रेल्वेमार्गावरील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वेसेवेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर १३ जानेवारी २०२४ पासून ही सेवा सुरू झाली. उरण-नेरूळ मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील काही महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना त्‍या तुलनेत सुविधा पुरवण्यात रेल्‍वे प्रशासन अपयशी ठरले आहे. उरण-नेरूळ रेल्वेमार्गावर उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार ही चार रेल्वेस्थानके आहेत. यापैकी द्रोणागिरी रेल्‍वेस्‍थानकामध्ये शौचालय सुरू नसल्‍याचे बाब समोर आली आहे. शौचालयांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याने दुर्गधी पसरत आहे, तर द्रोणागिरी रेल्वेस्थानकाचे शौचालय सुरू नसल्याची बाब समोर येत आहे. रेल्वे सूरू झाल्यानंतर अवघ्या १८ महिन्यांत रेल्वेस्थानकाची दुर्दशा झाली आहे.
उरण रेल्वेस्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचते. गेल्या वर्षी पावसाळ्यात या स्थानकातील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी भरले होते. त्यामुळे यावर्षीदेखील ही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने मार्गात पाणी भरल्यास ते काढण्यासाठी पाच जनरेटर मोटार पंप आणले आहेत. द्रोणागिरी रेल्वेस्‍थानकावर काही ठिकाणी छप्पराचे पत्रे निखळले आहेत. अनेक ठिकाणी लाद्या निघाल्या आहेत. रेल्वे परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्या गवतांमध्ये सापांचा वावर असल्याची भीती वर्तविली जात आहे.
उरण रेल्वेमार्गावर प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतानादेखील लोकलच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत. कधी कधी तर तासाभराने लोकल असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत रहावे लागते. रात्री उशिरा रेल्वेच्या फेऱ्या बंद असल्यामुळे नोकरदार तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावरून घरी येताना खासगी वाहनांचा किंवा एनएमएमटीचा आधार घ्यावा लागतो.
गव्हाण रेल्वेस्थानकही प्रत्यक्ष सुरू झाले नसल्‍याने नागरिकांना खारकोपर स्थानकानातून इच्छितस्थळी जावे लागत आहे. या भेडसावणाऱ्या समस्या रेल्वे प्रशासनाने सोडवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उरण रेल्वेस्‍थानक
उरण रेल्वेस्‍थानकामध्ये शौचालय आहे, परंतु या शौचालयामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. उरण रेल्वेस्थानकाच्या लाद्या उखडल्या आहेत. रेल्वेस्थनकात पाण्याची सोय नाही. प्रवाशांना तिकिटापेक्षा पार्किंगसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

द्रोणागिरी रेल्वेस्‍थानक
द्रोणागिरी रेल्‍वेस्‍थानकामध्ये प्रवाशांची संख्या अधिक असली तरी सुविधांचा अभाव आहे. शौचालय बंद अवस्‍थेत असून, प्रवाशांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात पाणी साचले जात आहे. लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या असून, स्‍थानक परिसरात जाण्या-येण्याच्या मार्गाच्या बाजूला गवत वाढलेले आहे. त्यामुळे सापांचा वावर वाढू शकतो.

न्हावा-शेवा रेल्वेस्‍थानक
हे रेल्वेस्थानक चढण्यासाठी उंच असल्याने वयोवृद्धांची गैरसोय होते. या रेल्वेस्थानकात एकाच बाजूला तिकीटघर आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मोटा वळसा घेऊन कसरत करावी लागते. प्रवासी जाण्या-येण्याच्या मार्गात पावसाचे पाणी पडलेले असते. स्वच्छतेचा अभाव आहे.

शेमटीखार रेल्वेस्‍थानक
या रेल्वेस्थानकातून प्रवाशांची संख्या कमी असली तरीही या रेल्वेस्थानकातही शौचालय अस्वच्छ असणे, पाण्याची सुविधा नसून परिसरात गवताचे वाढलेले प्रमाण, अशा विविध समस्या आहेत.

रेल्‍वेस्‍थानकांमध्ये प्रवाशांना अनेक समस्‍या भेडसावत आहेत. लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. द्रोणागिरी रेल्वेस्थानकात तर शौचालय सुरूच झाले नाही. सर्वच स्‍थानकांमध्ये विविध प्रकारे प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.
- गणेश म्हात्रे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com