पाचव्या दिवशी कृत्रिम तलावाला पसंती

पाचव्या दिवशी कृत्रिम तलावाला पसंती

Published on

पाचव्या दिवशी कृत्रिम तलावाला पसंती
८ हजार ९८४ गणेशमूर्तींचे विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : पाच दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजाअर्चा केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात रविवारी (ता. ३१) निरोप देण्यात आला. या वेळी भाविकांनी गणरायाचे विसर्जन कृत्रिम तलावात केले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक भाविकांनी कृत्रिम तलावाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाचव्या दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रविवारी भक्तिमय वातावरणात झाले. यावर्षी पालिका क्षेत्रात पाच दिवसांच्या आठ हजार ९८४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी चार हजार ८११ मूर्ती शाडू मातीच्या, तर चार हजार १७३ मूर्ती पीओपीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून ठाणे महापालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी यावर्षीही चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेशमूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण २५ गणेशमूर्ती, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील ६२ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका आणि प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती.

सहा टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान
यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे बायोकंपोस्टिंग प्रकल्प कार्यान्वित आहेत. पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे सहा टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. निर्माल्यांतील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्या‍त येणार आहेत.

विसर्जनाची आकडेवारी - पाचवा दिवस
विसर्जन स्थळ (संख्या) गणेशमूर्तींची संख्या गतवर्षीची संख्या
• कृत्रिम तलाव (२४) ५, ९९९ ३, ९४८
• विशेष हौद (टाकी) व्यवस्था (७७) १, ५३२ ५८१
• खाडी विसर्जन घाट (०९) १, ३६६ २, ४८२
• फिरती विसर्जन व्यवस्था (१५) ६२ ००
• मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) २५ ८५
• एकूण ८, ९८४ ७, ०९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com