रोह्यात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या

रोह्यात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या

Published on

रोह्यात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या
बेशिस्त पार्किंगसह फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण
रोहा, ता. २ (बातमीदार) ः रोहा शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असून, सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्त उभी केली जाणारी वाहने, फेरीवाल्यांची गर्दी आणि अवजड वाहनांची बाजारपेठेत होणारी वर्दळ यामुळे वाहतुकीचा बोजवारा पूर्णत: उडाला आहे.
वाहतूक शाखेकडून काही प्रमाणात नियोजन करण्यात आले असले तरी, पोलिस कर्मचारी थोड्या वेळासाठी हटल्यावर वाहनचालक पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रोह्याच्या प्रवेशद्वारापासूनच ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते. या परिस्थितीमुळे नागरिकांचा संताप वाढत आहे. बंदर पकटी येथील शेख सलाऊद्दीन बाबा दर्गा समोरील मोरीचे काम सुरू असल्याने धाटाव एमआयडीसीमध्ये जाणारी अवजड वाहने, साळाव येथील इस्पात कंपनीकडे जाणाऱ्या गाड्या, तसेच अलिबाग, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन, दिघी, आगारदांडा आदी ठिकाणांकडे जाणारे मुंबई-पुण्यातील पर्यटक यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. शिवाय श्री धावीर महाराज मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दीदेखील वाढत आहे.
....................
गणेशोत्सवामुळे गर्दीत अधिक भर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावी येणाऱ्या प्रवाशांची, पर्यटकांची व वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे आधीच अस्ताव्यस्त असलेली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बाजारात पावला-पावलांवर ट्रॅफिक जॅम दिसून येत असून, नागरिकांना गाडीतच बराच वेळ थांबावे लागत आहे.
................
बेशिस्त पार्किंग, फेरीवाल्यांची गर्दी
नियोजनाशिवाय चारचाकींची पार्किंग, दुचाकींची रांग, तसेच कुठलाही धाक नसलेले फेरीवाले यांच्या कारणाने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. बाजारातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची अव्यवस्थित उभी केलेली रांग ही समस्येची मुख्य कारणे ठरत आहेत. त्यामुळे अडकलेल्या वाहनांतून हॉर्नचा कर्कश्श आवाज नागरिकांच्या त्रासात अधिक भर घालत आहे. सामान्य नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि पोलिस विभागाकडे तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, फेरीवाल्यांवर नियंत्रण आणि अवजड वाहनांना बाजारात प्रवेशबंदी ही मागणी जोर धरत आहे. अन्यथा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिकच बळावेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com