वाळंजवाडी वळणावर साईडपट्टीला भगदाड
वाळंजवाडी वळणावर साइडपट्टीला भगदाड
प्रवाशांचा जीव मुठीत; सार्वजनिक बांधकाम विभागावर टीका
रोहा, ता. २ (बातमीदार) ः कोलाड ते सुतारवाडी यादरम्यानच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रस्त्यावरील साइडपट्ट्यादेखील धोकादायक बनल्या आहेत. विशेषतः वाळंजवाडी रस्त्याच्या वळणावर असलेल्या साइडपट्टीला मोठे भगदाड असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या साइडपट्टीवरून एखादे वाहन पलटी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक प्रवासी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार यांना जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे दुचाकीचालकांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सुतारवाडी दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे आणि साईडपट्ट्या तात्पुरत्या दुरुस्त केल्या होत्या, मात्र आता पुन्हा या साइडपट्ट्या आणि खड्ड्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे केवह मंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच काम होते का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या धोकादायक रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. कोलाड ते सुतारवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, मात्र वाळंजवाडीच्या वळणावरील भगदाडामुळे धोका अधिक वाढला आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. या मार्गावरून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. यामुळे केवळ वाहतूक नाही, तर प्रवाशांच्या जीवितासही मोठा धोका निर्माण झाला आहे.
..................
गणेशोत्सव संपला तरी काम शून्य
यंदाचा दीड दिवसाचा आणि पाच दिवसांचा गणपती उत्सव संपूनही अद्याप दुरुस्तीसाठी हालचाल झालेली नाही. या कालावधीत हजारो भक्तांनी या मार्गाचा वापर केला, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचे आणि साइडपट्टी दुरुस्त करण्याचे सौजन्य दाखविलेले नाही. नागरिकांचा रोष वाढत असून, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.............
तातडीने दुरुस्तीची गरज
स्थानिकांनी प्रशासनाला वारंवार कळवूनही उपाययोजना झालेल्या नाहीत. साइडपट्ट्यांचे भगदाड बुजविणे आणि रस्ता दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.