कर्जत स्थानकावर प्रवाशांची गैरसोय;

कर्जत स्थानकावर प्रवाशांची गैरसोय;

Published on

कर्जत स्थानकावर प्रवाशांची गैरसोय;
प्लॅटफॉर्म दोनवर शेडचा अभाव, महिला प्रवासी त्रस्त
कर्जत, ता. २ (बातमीदार) ः मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे कर्जत रेल्वेस्थानकात प्रवाशांना सोयीसुविधापासून वंचित राहावे लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरी लोकल गाड्यांसाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरते. ठाणे जिल्हा आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या येथे गर्दी करते, मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर सोयीसुविधांचा गंभीर अभाव जाणवत असून, पावसाळा किंवा उन्हाळ्यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
प्लॅटफॉर्म दोनवर बदलापूर दिशेकडील बाजूस शेड नसल्यामुळे पावसाळ्यात प्रवासी अक्षरशः भिजतच प्रवास करतात. त्यातच मेल-एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या याच प्लॅटफॉर्मवर थांबत असल्याने गर्दी अधिक होते. पहिल्या चार डब्यांचा भाग उघड्यावर येतो, ज्यामध्ये महिला प्रवाशांसाठी राखीव डबादेखील असतो. त्यामुळे महिला प्रवाशांना पावसात उभे राहावे लागते. उन्हाळ्यात तर प्रखर उन्हामुळे त्रास दुप्पट होतो. वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
..................
प्रवासी संघटनांचा रोष, अपघाताचा धोका
प्लॅटफॉर्मवर अर्धवट छप्पर असल्याने पावसाळ्यात गाडीची वाट पाहताना प्रवासी भिजतात. लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे काही डबे छप्पर नसलेल्या भागात थांबत असल्याने प्रवाशांना छप्पर असलेल्या भागात धावपळ करून गाडी पकडावी लागते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. या समस्येबाबत प्रवासी संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला असून, रेल्वे प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
..................
रेल्वे प्रशासनाकडे मागणी
कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी सांगितले की, फलाट क्रमांक दोनवर अर्धवट छप्पर असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याशिवाय कर्जत स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत योजने’तही नाही, तर भाजप रेल्वे प्रकोष्टचे सहसंयोजक व सेंटर रेल्‍वेचे सदस्य नितीन परमार म्हणाले, या समस्यांसह कर्जत स्टेशनच्या इतर प्रश्नांबाबत आम्ही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला आहे. कर्जत स्‍थानकाचा समावेश अमृत भारत योजनेत करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
.................
प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा
प्रवाशांची नाराजी दिवसेंदिवस वाढत असून, तातडीने शेड बसविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी, विशेषतः महिला प्रवासी या समस्येमुळे त्रस्त आहेत. रेल्वे प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्जतसारख्या महत्त्वाच्या स्थानकावर अशा मूलभूत सोयींचा अभाव रेल्वेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी सेवेला सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी शेडसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com