अतिक्रमणांमुळे कोलशेत रस्त्यावर कोंडी

अतिक्रमणांमुळे कोलशेत रस्त्यावर कोंडी

Published on

अतिक्रमणांमुळे कोलशेत रस्त्यावर कोंडी
महापालिकेच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे पालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवरील कोंडीला पर्याय म्हणून अंतर्गत रस्त्यांची निर्मिती केली आहे. त्यानुसार पर्यायी रस्ता असलेल्या ढोकाळी डी मार्टपासून ते कोलशेत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले; मात्र या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे बेकायदा पार्किंग करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे.

घोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून कोलशेत रस्त्याकडे पहिले जाते. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असतानाच, या रस्त्यावरील डि-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत. रस्त्यावर तसेच पदपथावर फेरीवाले गाड्या लावत असून, यामध्ये खाद्यपदार्थांच्या गाड्यांसह पानटपऱ्यांचा समावेश आहे.

पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर राजरोजपणे गॅस आणि स्टोव्हसारखी उपकरणे वापरली जात असून, या गाड्या रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. दुसरीकडे खाद्यपदार्थ गाड्यांवरील ज्वालाग्राही उपकरणांमुळे स्फोट होण्याची भीती व्यक्त करत वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने कोलशेत रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरीवाला आणि ना पार्किंग क्षेत्र करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

रस्त्यावरील डी-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरीवाला आणि पार्किंग क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार याठिकाणी ना पार्किंग क्षेत्र असे फलकही लावण्यात येणार होते. यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशाकीय सभेने मान्यता दिली होती. त्यानंतरही असे फलक अद्याप लावलेले नाहीत. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

महापालिकेकडे तक्रार
रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले, पानटपाऱ्या, खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या थाटण्यात आल्या असून, अनेक ठिकाणी गॅस आणि स्टोव्हचा वापर करून अन्नपदार्थ तयार केले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गाड्यांमुळे ज्वालाग्राही उपकरणांचा धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात वायुदल अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेकडे तक्रार नोंदवली होती.

नागरिक त्रस्त, वाहतूक ठप्प
महापालिकेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईमुळे, अतिक्रमण वाढत आहे आणि वाहतुकीचा भार न झेपणाऱ्या रस्त्यावर रोज कोंडीचे चित्र पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com