एक गाव-एक गणपतीची ७२ वर्षांची अखंड परंपरा
एक गाव-एक गणपतीची ७२ वर्षांची अखंड परंपरा
मोहोगावचा आदर्श गणेशोत्सव; सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल, ता. २ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील मोहोगावने गेल्या ७२ वर्षांपासून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. १९५४ पासून सुरू झालेली ‘एक गाव-एक गणपती’ ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू असून, यावर्षीचा गणेशोत्सव सुवर्णमहोत्सवी वर्ष ठरला आहे.
मोहोगाव हे आगरीबहुल, निसर्गरम्य असे गाव असून, गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार असून, पाचशे उबंरठे आहेत. प्रत्येक घरात वेगळा गणपती न बसवता गावकरी एकाच ठिकाणी एकत्र येऊन गणेशाची स्थापना करतात. त्यामुळे गावातील एकोपा, स्नेह आणि बंधुभाव अधिक दृढ झाला आहे. घराघरात खर्च न करता सार्वजनिक पातळीवर गणेशोत्सव, गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासारखे सर्व सण आनंदाने आणि एकत्र साजरे केले जातात. गावातील तरुण मंडळी गणेशोत्सवात सजावट आणि आरास स्वतः तयार करतात. विशेष म्हणजे ही आरास पूर्णपणे इकोफ्रेंडली असते. पर्यावरणपूरक आरास व सजावट हा मोहोगावच्या उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे. पारंपरिक कलांचे जतन करत आधुनिकतेशी सुसंवाद साधणारी ही आरास भाविकांचे लक्ष वेधून घेते.
...............
सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम
गावात गणेशोत्सवाच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, भजन-कीर्तन, काकड आरती यांचे आयोजन केले जाते. यंदा विशेष उपक्रम म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. यामुळे गावाकडून ‘आध्यात्मिक संस्कृतीची जपणूक करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून गावातील अबालवृद्ध, महिला-पुरुष सर्वजण उत्सवात मनःपूर्वक सहभागी होतात. एक गाव-एक गणपती या संकल्पनेतून गावाने एकतेचा, शिस्तीचा आणि संस्कारांचा आदर्श संपूर्ण समाजासमोर ठेवला आहे.
..................
समाजासाठी अनुकरणीय परंपरा
गणेशोत्सव हा आज अनेक ठिकाणी अवाजवी खर्च, स्पर्धा आणि दिखाऊपणामुळे मूळ उद्देशापासून दूर गेला आहे, मात्र मोहोगावने ‘एक गाव-एक गणपती’च्या संकल्पनेतून खर्चाला फाटा देत सामाजिक ऐक्याची आणि पर्यावरणपूरकतेची प्रेरणादायी परंपरा जोपासली आहे. ७२ वर्षे अखंड चाललेली ही परंपरा केवळ मोहोगावापुरतीच मर्यादित नाही, तर इतर गावांसाठीही आदर्श ठरत आहे.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.