गौरीसंग गणराय निघाले गावाला
गौरीसंग गणराय निघाले गावाला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत बुधवारी (ता. २७) सर्वत्र बुद्धीचा देवता असलेल्या गणरायाचे आगमन झाले. सहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात मंगळवारी (ता. २) साश्रूनयनांनी व भावपूर्ण वातावरणात ठाणे पोलिस आयुक्तालयातील ३४ हजार गणरायांसह १५ हजार गौरीमातांना निरोप देण्यात आला. या वेळी ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या व काही राजकीय मंडळींकडून गणरायांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.
श्रावण महिना संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात. मोठ्या उत्साहात, आनंदमय वातवरणात ढोल-ताशांच्या गजरात २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन झाले. तर रविवारी (ता. ३१) गौरीमातेचे घरोघरी आगमन झाले. माहेरवाशीण आलेल्या गौराईचे सोमवारी (ता. १) पूजन झाल्यानंतर मंगळवारी गणपतींसह गौराईला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर गुरुवारी सायंकाळपासून बँजो, ढोल आणि ताशांच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ठाणे पूर्व कोपरीतील कोळीवाडा येथून गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भाविकांनी गर्दी केली होती. गौराईचे नटलेले विलोभनीय रूप आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी महिलावर्गाने गर्दी केली होती. तर अष्टविनायक चौकट राजकीय व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
मंगळवारी ठाणे पोलिस आयुक्तालयातील ५३ हजार ५८२ गणपती व गौरीमातेचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये १७३ सार्वजनिक तर, ३४ हजार २९४ घरगुती गणपती बाप्पांचा तसेच १५ हजार ३२७ गौरीमातांना निरोप देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव
ठाणे शहरात गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातिवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नंबर एक, रायलादेवी तलाव नंबर दोन, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वूडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. तसेच वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा), कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण सात विसर्जन घाट तयार केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.