एका क्लिकवर करा तक्रारी

एका क्लिकवर करा तक्रारी

Published on

तक्रारी करणे झाले सोपे
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : खतांचा तुटवडा, जमिनीचा व्यवहार, नागरी समस्या असो वा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी येणारी अडचण असो, जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या अडीअडचणी आणि तक्रार नोंदवण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढण्याची गरज नाही. प्रशासनाने जिल्हावासीयांच्या सुविधेसाठी आपला व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला असून, त्यावर तक्रारी आणि अडचणी मांडता येणार आहेत. त्यामुळे शहापूर-मुरबाडसारख्या अतिदुर्गम भागातील गाव खेड्यातील तक्रारदारालाही मोबाईलच्या एका क्लिकवर प्रशासनाकडे आपले गाऱ्हाणे मांडणे सोपे जाणार आहे.
वाढते नागरीकरण आणि विकास याचा ताळमेळ बसवत ठाणे जिल्हा प्रगतीकडे झेप घेत आहे. एकीकडे औद्योगीकरण तर दुसरीकडे पारंपरिक शेती असा ताळमेळ जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. असे असले तरी सातबारा उताऱ्यासह दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक समस्या वाट्याला येतात. यापैकी बहुतेक तक्रारी या जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडित असतात. अशा वेळेला आपला तक्रार अर्ज घेऊन नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. अर्ज दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खेटे मारावे लागतात. शहापूर-मुरबाड-भिवंडी ग्रामीण यासारख्या भागातील नागरिकांना त्यासाठी दिवस मोडावा लागतो. त्यांची ही दगदग कमी व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतनुसार प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सॲपव्दारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रारी, अडीअडचणी सादर करण्यासाठी ९९३०००११८५ हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे.

तक्रारीसाठी सूचना पाळा
व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदविताना, तक्रार ज्या विभागाची आहे, त्या विभागाचे नाव व्यवस्थित नमूद करावे लागणार आहे. तसेच, तक्रारदाराने स्वतःचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, ई-मेल व मोबाईल क्रमांकही नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खासगी संदेश टाळा
या व्हॉट्सॲपवर आपल्या तक्रारीव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ वा अन्य मजकूर पाठवू नये. ही सुविधा कॉलिंगसाठी नाही, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.

आठ दिवसांत तक्रारींचा निपटारा
केवळ मेसेजद्वारे आपली तक्रार नोंदविण्यासाठी या व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला आहे. मेसेजव्दारे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने आपली टीम तयार केली आहे. ज्या विभागाची तक्रार आहे किंवा ज्या गाव तालुक्याची तक्रार आहे, तिथपर्यंत ती पोहोचून त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनच घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली. दरम्यान, तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरूपाची तक्रार करू नये. एकाच वेळेस तक्रार पाठवावी, त्याची नोंद घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com