प्रभाग रचनेचा भाजपला धक्का
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : महापालिकेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रभागरचनेवर महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांपासून अगदी सर्वच लोकप्रतिनिधी बोंब मारत आहेत, परंतु या प्रभागरचनेचा भाजप प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या नवी मुंबई जिल्हापातळीवर बैठकीत हाच सूर उमटला. पॅनेल पद्धतीमुळे पूर्वीचे प्रभाग फोडून चार प्रभागांचा एक पॅनेल तयार करण्यात आला आहे. यात बऱ्याच माजी नगरसेवकांच्या प्रभागातील परिसर दुसऱ्या पॅनेलला जोडला गेल्यामुळे गोंधळ उडाला आहे.
नवी मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार आहे. १११ जागांकरिता २८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार हे पॅनेल तयार करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे सांगण्यात येत आहे, परंतु पूर्वीच्या प्रभागांनुसार आता हे प्रभाग राहिलेले नाहीत. नवी मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या नगरसेवकांची निर्विवाद सत्ता राहिलेली आहे. अगदी २०१५ ला देशभरात मोदी लाटेचे वादळ असतानाही त्यांनी महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणून आपला करिष्मा दाखवला होता. पालिकेची प्रभागरचना तयार करण्यापासून ते नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत प्रभागावर राजकीय प्रभाव जाणवत होता, मात्र या निवडणुकीत पॅनेल तयार करण्यासाठी अनेक जुने प्रभाग फोडण्यात आले आहेत. या फोडाफोडीमध्ये भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांना दणका बसला आहे.
बेलापूर, सीवूड्स, नेरूळ आणि जुईनगर येथील प्रभागांची एकमेकांमध्ये घुसखोरी झाली आहे. बेलापूरचा महापालिकेचा विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणारा बराचसा सीवूड्स आणि नेरूळचा भाग दुसऱ्या प्रभागांना जोडला आहे. नेरूळ, जुईनगर, शिरवणे, करावे, दारावे हा परिसर वेगळ्याच प्रभागात टाकण्यात आला आहे. जुईनगरचा काही भाग पूर्वी सानपाडामध्ये असायचा, आता तो अगदी वाशीपर्यंतच्या प्रभागात दाखवण्यात आला आहे. तुर्भेमध्ये १४ गावांचा परिसर नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. दिघा परिसरात येणारा इलठाणपाडा, गणपतीपाडा, ईश्वरनगर आदी परिसराची विभागणी झाली आहे. ऐरोली, महापे, घणसोली आणि कोपरखैरणे या भागातही अशीच अवस्था झाली आहे, मात्र याबाबत काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमधील महत्त्वाचा पक्ष असणाऱ्या शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनी अद्याप प्रभागरचनेच्या नकाशांवर नाराजी व्यक्त केलेली नाही.
---
भाजपकडून तक्रारींचा सूर
जुईगावाला वाशी सेक्टर-१७ आणि काँग्रेस भवनचा परिसर जोडलेला आहे. मुख्य रस्ते आणि जलवाहिन्यांचा विचार केलेला नाही. परिणामी नागरिकांची पूर्णपणे गैरसोय होणार आहे. अधिसूचनेतील व्याप्ती आणि नकाशानुसार प्रभागरचना केलेली नाही. एक गाव एकाच प्रभागात आला पाहिजे, मात्र एक गाव तीन ठिकाणी जोडलेले आहेत. जुईनगरचा अर्धा भाग सानपाडा आणि नेरूळ पश्चिमपर्यंत जोडण्यात आला. प्रभागाच्या नकाशाची रचना विचित्र पद्धतीने केली आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला लाभ व्हावा, याकरिता ही रचना केल्याचे दिसून येत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांकडून केल्या जात आहेत.
७६ हजार दुबार नावे वगळायला भाग पाडणार
ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांत तब्बल ७६ हजार मतदारांची दुबार नावे असल्याची तक्रार काँग्रेसने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याची सूचना संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. विशेष म्हणजे या मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावला असल्याचा दावाही नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. त्यामुळे ही नावे वगळण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अनेक माजी नगरसेवकांचे जुन्या प्रभागांची चुकीच्या पद्धतीने फोडाफोडी झाल्याच्या तक्रारी मांडल्या. त्यांना तत्काळ हरकती आणि सूचना घेण्यास सांगण्यात आले. प्रभागरचनेतील नकाशे हे व्याप्तीला धरून नाहीत. सरकारने नवी मुंबई महापालिकेच्या प्रभागरचनेकरिता काढलेल्या अधिसूचनेनुसार नकाशे दिलेले नाहीत. सात ते आठ किमी अंतर असणारे परिसर वेगळ्या प्रभागांमध्ये टाकलेले आहेत. याविरोधात आम्ही हरकती घेतलेल्या आहेत. एखाद्या ठरावीक पक्षाला फायदा होणारे प्रभाग असल्याचे दिसते.
- डॉ. राजेश पाटील, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.