दक्षिण मुंबईने घेतला मोकळा श्वास

दक्षिण मुंबईने घेतला मोकळा श्वास

Published on

दक्षिण मुंबईने घेतला मोकळा श्वास
आंदोलकांनी गाड्याही हलविल्या; पालिकेकडून साफसफाई सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार, आंदोलकांनी दक्षिण मुंबईचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या मार्गदर्शनात आंदोलकांनी रस्ते मोकळे केल्याने सीएसएमटी परिसराने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती घेत परिसर स्वच्छ केला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच पालिका मुख्यालयासमोरील रस्ता चार दिवस ठप्प झाला होता. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरही आंदोलकांनी ठाण माडले होते; मात्र उच्च न्यायालयाने आंदोलकांच्या हुल्लडबाजीची गंभीर दखल घेत त्यांची खरडपट्टी काढली. आंदोलनकांनी व्यापलेला परिसर मोकळा करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे पोलिस आज ॲक्शन मोडवर आले. पोलिसांची अतिरिक्त कुमक सीएसएमटी स्थानकात आणि परिसरात तैनात करण्यात आली. सीएसएमटी स्थानक आणि परिसर मोकळा करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात होते. त्याला प्रतिसाद देत आंदोलकांनी परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली.
----
मागण्या मान्य, आंदोलकांमध्ये जल्लोष!
आंदोलकांच्या काही मागण्या पूर्ण झाल्याची बातमी समजताच आंदोलकांनी आझाद मैदानात जल्लोष केला. पाच दिवसांच्या संघर्षाला यश आल्याची भावना आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गावाकडे परतताना आनंदाचा गुलाल उधळत जाण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांच्या होत्या.
----
घरी परतताना पुन्हा गर्दी
मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी रेल्वेला प्रचंड गर्दी झाली. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने वाहतूक जाम झाली. रात्री उशिरा रस्ते, रेल्वेला झालेली गर्दी ओसरायला लागल्याचे दिसले.
----
रस्ते चौक मोकळे
मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील रस्ते जाम झाले होते; मात्र न्यायालयाच्या निर्देशानंतर आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घेत रस्ते, चौक, रेल्वेस्थानक परिसर मोकळे करून दिले. त्यामुळे पाच दिवसांपासून झालेली वाहतूक कोंडीही हळूहळू दूर झाली.
----
कचऱ्याची दुर्गंधी
गेले चार दिवस छत्रत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवर अन्न, केळी, बिस्किटे आणि पाण्याचे वितरण केले जात होते. पाण्याच्या बाटल्यांचा खच ठिकठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर दिसत होता. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने परिसरात चिखल झाला होता. सफाई कामगारांनी आज सर्व रस्ता साफ केला, तरीही दुर्गंधी कमी होत नव्हती. आज हा परिसर स्वच्छ झाला आहे.
---
पोलिसांनी बळाचा वापर केला नाही
मुंबईत ठिकठिकाणी हुल्लडबाजी केल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेत आंदोलकांना फटकारले. आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी अडवलेल्या जागा उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मोकळ्या करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आंदोलकांनी ऐकले नाही, तर सरकार कारवाईला मोकळे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांनी आज आंदोलकांना हुसकावले; मात्र कुठेही बळाचा वापर केला नाही.
---
यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता
पालिकेचे शेकडो कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून यंत्रांच्या सहाय्याने रस्ते, चौक स्वच्छ केले. या कामासाठी स्किड स्टिअर लोडर म्हणजेच बॅाबकॅटद्वारे स्वच्छता केल्याचे पालिकेने सांगितले. लवकरात लवकर या परिसरात स्वच्छता करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले.
----
पालिकेचे ४०० कर्मचारी रात्रभर कार्यरत
मराठा आरक्षण आंदोलनामुळे आझाद मैदान व परिसरात उसळलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारी (ता. १) मध्यरात्रीपासून स्वच्छतेसाठी व्यापक मोहीम राबवली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील तब्बल ४०० हून अधिक कर्मचारी स्वच्छता राखण्याचे कार्य अविरत करीत होते. महापालिकेच्या पथकांनी रात्री १० वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत मैदान आणि परिसरातील घनकचरा उचलणे, शौचालयांची सफाई, जंतूनाशक फवारणी आदी कामे केली. या काळात दोन मिनी कॉम्पॅक्टर, एक लार्ज कॉम्पॅक्टर तसेच पाच लहान आकाराची कचरा संकलन वाहने मैदानात कार्यरत होती. शिवाय आंदोलकांच्या सहकार्यातून कचरा व्यवस्थापनासाठी दोन हजार डस्टबिन बॅग्स आणि संकलन पेट्या वितरित करण्यात आल्या. रात्रभर सुरू असलेल्या या कार्यवाहीदरम्यान शौचालयांच्या देखभालीसाठी सक्शन आणि जेट स्प्रे संयंत्रांचा वापर करण्यात आला. यामुळे ४५० हून अधिक स्थायी व फिरती शौचालये स्वच्छ ठेवण्यात प्रशासनाला यश आले. मैदानात कीटकनाशक व जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. कीटक नियंत्रण विभागाने परिसरात दुर्गंधी व डासांची समस्या उद्भवू नये, यासाठी धूर फवारणी केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com