गणपती दर्शनातून नवी राजकीय समीकरणे
गणपती दर्शनातून नवी राजकीय समीकरणे
महापालिका निवडणुकीआधी हालचालींना वेग
शर्मिला वाळुंज ः सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या नेत्यांच्या दर्शन भेटींमधून नवे राजकीय संकेत उमटू लागले आहेत. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या दोघांनीही म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या भेटींमुळे म्हात्रे यांच्या ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या चर्चांना जोर आला आहे. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केला होता; परंतु आता पुन्हा भाजप किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रथमच पॅनेल पद्धतीने निवडणुका होणार आहेत. चार प्रभागांचा एक प्रभाग अशी रचना असल्याने राजकीय पक्षांनी आपल्या पॅनेलमधील उमेदवारांची शोधाशोध सुरू केली आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि शिंदे गटातून बाहेर पडलेले महेश गायकवाड हे दोन महत्त्वाचे नेते सध्या ‘नाराज गटात’ मानले जात असून, त्यांच्यासोबतही संवाद सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, चव्हाण आणि डॉ. शिंदे यांनी या दोघांच्या घरीही गणपती दर्शनासाठी भेट दिली.
दीपेश म्हात्रे यांच्यामुळे कल्याण-डोंबिवली तसेच ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. जिल्हाप्रमुखाची जबाबदारी म्हात्रे यांच्यावर असून शिंदे गट तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याविरोधात विविध विकासकामांवरून म्हात्रे यांनी प्रतिहल्ला केला आहे. आंदोलन, मोर्चे यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षात हालचाली सुरू ठेवल्या आहेत; मात्र म्हात्रे यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी सख्य कायम असल्याच्या चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत. त्यातच भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांच्याशी म्हात्रे यांचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांशी त्यांचा सलोखा राहिला आहे.
निष्ठावंत शिवसैनिक नाराज
शिंदे सेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच दीपेश म्हात्रे व खासदार डॉ. शिंदे यांची गणपती दर्शनानिमित्त गळाभेट झाल्याचे दिसून आले. या वेळी आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, राजन मराठे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या कामकाजावर निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तसेच ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याची चर्चा आहे; मात्र त्यावर ठाकरे गटातून मात्र कोणत्याही प्रतिक्रिया उमटताना दिसत नाही.
नाराज नेत्यांच्या भेटीगाठी
शहरातील महत्त्वाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्या पक्षात असावेत, यासाठी भाजप, शिंदे शिवसेना विविध पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार पक्ष प्रवेशाच्या मोहिमा राबवित आहेत. अलीकडेच खासदार शिंदे यांनी सध्या भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांची डोंबिवलीतील त्यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनाचे निमित्त साथून भेट घेतली. आमदार राजेश मोरेही यापूर्वी त्यांची भेट घेऊन आले आहेत. विकास म्हात्रे आता भाजपमध्ये असले तरी नाराज असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
भाजपचीही तयारी सुरू
विकास म्हात्रे यांचे दोन प्रभाग आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर नाराज विकास यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे गट गुप्तपणे व्यूहरचना आखत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी शिंदे सेनेतून बाहेर पडलेले कल्याण पूर्वचे माजी शहरप्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेतली. कल्याण पूर्वेत भाजपविरोधी शिंदे गट असे वातावरण आतापर्यंत दिसून आले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजीच मिटवून घेण्याच्या तयारीत भाजप असल्याचे दिसून येत आहे.