प्रभाग रचनेविरोधात बदलापुरात ८८ तक्रारी

प्रभाग रचनेविरोधात बदलापुरात ८८ तक्रारी

Published on

प्रभागरचनेविरोधात बदलापुरात ८८ तक्रारी
प्रभाग क्रमांक तीन आणि चारमधून सर्वाधिक; आज सुनावणी

बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरच्या प्रभागरचना आराखड्यात भ्रष्टाचार झाल्याचा मोठा आरोप केल्यानंतर प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्यांवर अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. बदलापूर पालिका प्रभागरचनेच्या आराखड्याविरोधात एकूण ८८ तक्रारी दाखल झाल्या असून, यात प्रभाग क्रमांक तीन व चार या प्रभागात सर्वाधिक १६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सगळ्या तक्रारींवर पालिकेत मुख्याधिकारी दालनात आज, गुरुवारी (ता. ४) सुनावणी होणार असून, याबाबतीत काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, प्रारूप प्रभागरचना आराखडा तयार केला. आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच वादात अडकला होता. ही प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने झाली असून, रस्ते, रेल्वे सीमा, नदी या सगळ्या नियमांना बगल देऊन, प्रभागरचना आराखडा तयार केला असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आणि हा प्रभागरचना आराखडा तयार करण्यासाठी पालिकेत मुख्याधिकारींनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर या प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्याच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत पालिकेत एकूण ८८ तक्रारी दाखल झाल्या असून, प्रभाग क्रमांक तीन व चार या दोन प्रभागांमध्ये सर्वाधिक १६ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

प्रभाग क्रमांक तीन हा विचित्र पद्धतीने तयार केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे, तर प्रभाग क्रमांक दोन हा बदलापूर पश्चिम येथील मोहनानंद नगर येथून सुरू होऊन, उल्हास नदी ओलांडून थेट एरंजाड, सोनिवली आणि बदलापूर गावाच्या सीमेपर्यंत सहा किमी अंतरापर्यंत जातो. पालिकेत दाखल केलेला हरकतींवर उद्या गुरुवारी (ता. ४) कल्याणचे उपविभागीय अधिकारी व प्राधिकृत अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी प्रक्रिया होणार आहे.

बदलापूरकरांचे लक्ष
हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर त्यांचा अभिप्राय नगर विकास विभागाकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी सर्व आक्षेप आणि सूचना तपासून आवश्यक ते बदल करून अंतिम प्रभागरचना जाहीर करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आमदार किसन कथोरे आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com