एफडीएकडून सणासुदीत झाडाझडती

एफडीएकडून सणासुदीत झाडाझडती

Published on

वसई, ता. ३ (बातमीदार) : सणासुदीमध्ये ग्राहकाला सुरक्षित, निर्भेळ व सकस खाद्यपदार्थ उपलब्ध होण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या पालघर कार्यालयामार्फत विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा करताना खरेदी केलेल्या पदार्थांपासून नागरिकांना बाधा निर्माण होऊ नये, यासाठी एफडीएकडून झाडाझडती सुरू झाली आहे. दूध व दुग्धजन्य, अन्य पदार्थ विक्रीवर कठोर नजर ठेवण्यात येत आहे. यात एकूण ४७ नमुने विश्लेषणासाठी घेतले असून, १५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात मिष्ठान्नाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो, मात्र खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अन्नपदार्थांचा दर्जा व गुणवत्ता घसरते. गणेशोत्सवात विविध प्रकारच्या मिठाईकडे नागरिकांचा कल अधिक प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे एफडीएचे अधिकारी खाद्यपदार्थांची तपासणी करत आहेत. उत्पादनांची सुरक्षा, सुनिश्चितता, अन्न सुरक्षा मानकांचे पालन व ग्राहकांची फसवणूक याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी वसई-विरार शहर व पालघर ग्रामीण भागात कार्यशाळा घेण्यात आली. यात सूचना व कारवाईची माहिती अन्न औषध प्रशासनाकडून देण्यात आली, असे पालघर सहाय्यक आयुक्त द. सु. साळुंखे यांनी सांगितले.

व्यावसायिकांमध्ये जागृती
मिठाई व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रक्रिया, तसेच नमुने आदींविषयी जाणीव करून दिली. उत्सवात नागरिकांना मिठाईपासून कोणती बाधा होऊ नये, हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. एफडीएच्या मोहिमेत एकूण २५ अन्न आस्थापनांच्या तपासण्या केल्या असून, खाद्यतेल, मावा मिठाई, नमकीन व इतर अशा विविध अन्नपदार्थांचे एकूण ४७ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. यामध्ये भेसळ आढळल्यास कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कारवाई होणार
अन्न व औषध प्रशासनाकडून बटाटा वेफर्स आणि चकलीमध्ये भेसळीच्या संशयावरून आठ हजार ७५० किलो माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. त्याची किंमत एकूण १५ लाख ६९ हजार असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.

ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी केवळ परवानाधारक, नोंदणीधारक आस्थापनेमधूनच करावी. सीलबंद अन्नपदार्थांवर लेबल पाहूनच खरेदी करावी, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा वापर उत्पादकाने नमूद केलेल्या मुदतीमध्येच करावा. दुकानाची तपासणी करून नमुने घेतले आहेत, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- व्यं. ह. चव्हाण, सहाय्यक आयुक्त (अन्न)

जप्त मुद्देमाल किंमत
तेल ७,८५४ लिटर १३,९८,३१९
बटाटा वेफर्स २०० किलो ६०,०००
चकली ६९६ किलो ११,१३६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com