गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न

गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न

Published on

गणपती विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न
भाविक त्रस्त, पालिकेच्या दाव्यांची पोलखोल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण डोंबिवलीचे पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना गणेशोत्सवापूर्वीच शहरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले होते; मात्र आजही अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याच खड्ड्यांतून गौरी-गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली. खड्ड्यातूनच भाविकांनी गौरी- गणपतींची विसर्जन मिरवणूक काढली, त्याचबरोबर पावसामुळे या खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला.

गणेशोत्सव तोंडावर आला असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेला जाग आल्याचे यंदा दिसून आले. पावसाने शहरातील डांबरी रस्त्यांची खड्डे पडून अक्षरशः चाळण झाली आहे. गणपतींचे आगमन या खड्ड्यांतून झाल्याने पालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने दिवस रात्र रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. पालिका आयुक्त गोयल यांनी स्वतः या कामांची पाहणी त्या वेळी केली, मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पालिकेच्या या कामावर पाणी फेरले गेले आहे. डांबर टाकलेले रस्ते पुन्हा उखडले असून, गणरायाच्या आगमनाबरोबरच गणरायाची विसर्जन मिरवणूकदेखील खड्ड्यांतून काढावी लागत आहे. केडीएमसी हद्दीत आत्तापर्यंत दीड दिवसाचे, तीन, पाच आणि सहा दिवसांचे अशा एकूण २२ हजार २९३ खासगी आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले आहे. भक्तांना भर पावसात खड्ड्यांच्या रस्त्यातून गणेशमूर्ती नेताना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला.

खड्डेमय ठिकाणे
९० फूट रोड, टिळक रोड, नेहरू रोड, एम. जी. रोड, सुभाष रोड, नवापाडा, गरीबाचा वाडा, रेल्वे फाटक रोड, आयरेगाव, श्रीधर म्हात्रे चौक, कुंभारखान पाडा, भोपर, गोविंदवाडी बायपास, शिवाजी चौक, काटेमानिवली, कोळसेवाडी.

‘अ‍ॅप’चा उपाय
खड्ड्यांच्या तक्रारी आणि वाहतूक कोंडीमुळे पालिकेने तातडीने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे, ज्याच्या माध्यमातून नागरिकांना कृत्रिम तलावाचे लोकेशन, वाहतुकीचे पर्यायी मार्ग समजतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे, पण खड्डेच बुजवले गेले असते, तर अ‍ॅपची गरजच पडली नसती, असा नागरिकांचा सूर आहे.

नागरिकांचा संताप
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक वार्षिक अडचणी समोर येतात. रस्त्यांचे काम, वाहतुकीचा गोंधळ, आणि योजनांची अंमलबजावणी यातील विसंगती यंदाही स्पष्ट झाली. नागरिकांनी सोशल मिडिया, स्थानिक बातम्या आणि निदर्शने यामधून पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

गौरी-गणपती विसर्जनाची आकडेवारी
पोलिस ठाणे सार्वजनिक खासगी गौरी विसर्जन
महात्मा फुले चौक ४ ९०० २९०
बाजारपेठ ४ ४०० ३००
कोळसेवाडी ५ ११७० ४७०
खडकपाडा ७ ३१०५ ३६७
डोंबिवली १२ २७५० ९७५
विष्णूनगर ११ २३९५ २५०
मानपाडा ५ ४००० ३६००
टिळकनगर ८ ३०० २५०

एकूण विसर्जन :
सार्वजनिक गणपती – ५६
खासगी गणपती – १५,०२०
गौरी विसर्जन – ६,५०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com