पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बागायतदारांना दिलासा
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बागायतदारांना दिलासा
बोर्डी, ता. ३ (बातमीदार) ः पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिकू बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसाने मागच्या वर्षीप्रमाणेच या भागात बुरशीजन्य रोगाने पदार्पण केल्याच्या भीतीने बागायतदार हवालदिल झाले होते. नुकताच हंगाम सुरू होताच काही भागांमध्ये सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, मागच्या पंधरा दिवसांपासून सतत झालेल्या पावसाने बुधवारी (ता. ३) सकाळपासून उघडीप तर दिलीच किंबहुना दिवसभर ऊनही पडल्याने बागायतदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मागच्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे या भागात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मागच्या वर्षी खरीप हंगामात बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे बागायतदारांना आठ महिने चिक उत्पादनापासून वंचित राहावे लागले होते. चालू वर्षीदेखील हीच परिस्थिती येते काय अशा भीतीने शेतकरी हबकला होता, मात्र आज चांगले वातावरण मिळाल्यामुळे परिणाम कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तरीही डहाणू, कैनाड, आगवन, अस्वली, भागात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्रांनी सर्व्हे करून बागायतदारांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
६ व ७ मे रोजी अवकाळी पावसाने या भागातील चिकू बागायतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पावसाचे आगमनदेखील लवकरच झाले. शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा पाऊस पडला असला तरी बागायतीसाठी मात्र तो नुकसानकारक आहे. सतत पाऊस होत असल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि याबाबतीत योग्य ते निर्णय घेऊन बागातदारांना मार्गदर्शन करावे.
-विजय म्हात्रे, शेतकरी