
तलासरी उड्डानपुलाखालील गटार झाकणे मोडकळीस
अपघाताची शक्यता; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
तलासरी, ता. ३ (बातमीदार) : तलासरी उड्डाणपुलाखालील पेट्रोलपंप परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सेवा देणाऱ्या स्त्यावरील गटाराची झाकणे मोडकळीस आली असून, ती अनेक ठिकाणी उघडी पडली आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच या उघड्या गटारामुळे अपघाताची शक्यतादेखील वाढली असून, स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तलासरी नगरपंचायतीमार्फत प्राधिकरणाला अधिकृत पत्रव्यवहार करूनही आजतागायत काहीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. पेट्रोलपंप व बाजारपेठ परिसर असल्याने या ठिकाणी वाहनचालक, प्रवासी व ग्राहकांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात गटारीमध्ये कचरा, चिखल व गाळ साचल्याने पाणी वाहून परिसरात पसरते आणि असह्य दुर्गंधी निर्माण होते. तसेच पाण्याखाली गटाराची मोडकळीस आलेली झाकणे व खड्डे झाकले जात असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले असून, महामार्ग प्राधिकरणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. समस्या तातडीने सोडवून गटाराची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
-----------
यासंदर्भात तलासरी नगर पंचायततर्फे पत्र प्राप्त झाले असून, लवकरच महामार्ग दुरुस्ती विभागाकडून गटाराची दुरुस्ती करण्यात येईल.
- सुहास चिटणीस, प्राधिकरण मुख्य अधिकारी
------------
नागरिकांच्या तक्रारीनुसार नगर पंचायत तलासरीतर्फे यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. मात्र यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, यापुढेही आम्ही पत्रव्यवहार करू व लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू.
- गणेश बेरगळ, तलासरी नगरपंचायत, बांधकाम अभियंता