न्यायालयाने केला आंदोलनाचा समारोप

न्यायालयाने केला आंदोलनाचा समारोप

Published on

न्यायालयाने केला आंदोलनाचा समारोप
शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः पाच दिवसांपासून मुंबईत सुरू असलेले मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा अखेर समारोप झाला. आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबईत मुक्कामाची तयारीही केली होती. मुंबईच्या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील यांनी काय मिळवले याचे विश्लेषण पुढच्या काही काळात होणार आहे. आंदोलन यशस्‍वी झाले असले तरी मराठा बांधवांच्या मनामध्ये संभ्रम कायम असून, शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी नवी मुंबईच्या वेशीवरून माघारी फिरलेल्या जरांगे पाटील यांनी मुंबईला धडक देण्याची घोषणा तीन महिन्यांपूर्वी केली होती. गेल्या वेळच्या आंदोलनात मराठ्यांच्या पदरात फारसे काही न पडल्याने तसेच विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळाल्यामुळे मनोज जरांगे यांचा प्रभाव तसा कमी झाला होता. त्यामुळे दोनतृतीयांश बहुमत मिळवलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या प्रस्तावित आंदोलनाला फारसे विचारात घेतले नाही. प्रत्यक्षात आंदोलक मुंबईत पोहोचल्यानंतर राज्य सरकारवर थोडा दबाव वाढला. मराठा उपसमितीच्या बैठकीच्या हालचाली सुरू झाल्‍या.
जरांगे पाटील हे तीन महिन्यांपासून या आंदोलनाची तयारी करीत होते. गावोगावी या आंदोलनासाठी बैठका झाल्या. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतायचे नाही. हा निर्धार या वेळी केला. त्या मराठवाड्यात खेडोपाड्यात घराघरातून पैसै गोळा केले गेले. महिनाभराच्या अन्नधान्याची रसद तसेच मुंबईत टिकून राहण्याचा निर्धार मराठा आंदोलकांनी केला होता. पहिल्या दिवशी जरांगे आपल्या समर्थकांसोबत मुंबईच्या आजाद मैदानावर येऊन धडकले. त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले. मात्र आझाद मैदानाची अपुरी क्षमता व पावसामुळे मैदानात सर्वत्र चिखल झाल्यामुळे बहुतांश आंदोलक मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले. मुंबई मोकळे करण्याचे निर्देश राज्य सरकारला न्यायालयाने दिल्‍यानंतर आंदोलनाचा समारोप लवकरच होईल, याचे संकेत मिळाले होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे आंदोलकांना हटवण्याचे हत्यार सरकारला मिळाले. मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या कडक भूमिकेमुळे आंदोलन संपल्यात जमा झाले होते. दुपारनंतर सीएसएमटी स्थानक व परिसरातील रस्ते आंदोलकमुक्त झाले होते. मराठा आंदोलकांनाही आंदोलन संपेल याची कुणकुण लागली होती. त्यामुळे आंदोलकांनी कुठलाही विरोध न करता सर्वांनी आपापल्या गाड्या परिसरातून हलवण्यास सुरुवात केली.

जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले असे म्हणता येईल. या आंदोलनामुळे मराठा समाजाने काय मिळवले, हे शासन निर्णयाची अंमलबजावणी कशी होते त्यावर अवलंबून आहे.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com